चिपळूण :
कोयना वीज प्रकल्पाच्या उलोळ विहीर किंवा पोफळीतील सर्जवेलला गळती लागून पुढे ईव्हीटीमध्ये येऊन झिरपत असलेल्या पाण्यामुळे रविवारी पोफळीच्या पूर्वेला सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये धबधब्यासारखा पाण्याचा विसर्ग वाहू लागला. ऐन कडाक्याच्या उन्हाळ्यात कोसळणाऱ्या या पाण्यामुळे सारेच अचंबित झाले असले तरी गेल्या अनेक वर्षांपासून गळतीमुळे हा प्रकार सातत्याने घडत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून ही गळती सुरू आहे. मात्र गळतीचे प्रमाण कमी असल्याने ती दुर्लक्षित राहिली. पावसाळ्यातही पाण्याचा विसर्ग होत होता. मात्र धबधब्याचे पाणी असेल म्हणून लक्ष दिले गेलेले नाही. मात्र आता काही प्रमाणात त्यात वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. कोयना धरण पूर्व दिशेला आहे, तर पश्चिमेला कोयना वीज प्रकल्प आहे. प्रकल्पाच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यासाठी नवजा टॉवरमधून जे अधिजल भुयार किंवा हेड रेस टनेल निघते. या बोगद्याच्या शेवटी एक उलोळ विहीर किंवा सर्जवेल बांधलेली आहे.
या विहिरीपासून पुढे दाब बोगद्यातून पाणी पहिल्या व दुसऱ्या टप्प्याच्या वीजगृहाकडे जाते. ही सर्जवेल 1960 मध्ये बांधून पूर्ण झाली असून ती सह्याद्रीच्या कातळात 100 मीटर खोल खोदलेली आहे. या विहिरीला अर्ध्या मीटर ऊंदीचे काँक्रिट अस्तरीकरण केलेले आहे. या विहिरीने अनेक भूकंपाचे धक्के पचवलेले आहेत. मात्र काही ठिकाणी अस्तरीकरणाला तडे गेल्यामुळे सर्जवेलमधून हे झिरपलेले पाणी इमर्जन्सी व्हॉल्व्ह टनेल (ईव्हीटी) किंवा आपत्कालीन झडपाद्वारे भुयारामध्ये जाते आणि तिथून ते वाहत डोंगराच्या उतारावरून बाहेर पडत आहे. यामध्ये घाबरण्यासारखी किंवा गोंधळल्यासारखी कोणतीही परिस्थिती नसल्याचे तेथील सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.
- गळती काढण्याचे काम सुरू
कोयना जलविद्युत प्रकल्प टप्पा क्रं. 1 व 2 चे बांधकाम 1966 मध्ये पूर्ण झाले असून त्यातून अविरतपणे वीजनिर्मिती होत आहे. या प्रकल्पाचे संचलन महानिर्मिती कंपनीम़ार्फत सुरू आहे. कंपनीने आपत्कालीन झडप बोगदा व वायुवीजन बोगद्यातून होणाऱ्या गळतीबाबत पूर्ण जलवहन प्रणाली म्हणजेच नवजा आदान ते विद्युतगृहापर्यंत सर्व यंत्रणेची आधुनिक तंत्रज्ञान व यंत्रसामग्री वापरून तपासणी करण्यात आलेली आहे. परीक्षणांती, तांत्रिक सल्लागाराम़ार्फत सदर अहवालानुसार गळतीचा स्त्राsत व त्यावरील उपाययोजना, दुऊस्ती काम व मजबुतीकरण यावर सखोल अभ्यासाअंती कोयना जलविद्युत प्रकल्प टप्पा क्र. 1 व 2 च्या आपत्कालीन झडप बोगदा व उल्लोळ विहीरील गळती प्रतिबंधात्मक काम जलसंपदा विभागाम़ार्फत हाती घेण्यात आल्याचे तेथील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.








