ग्राम पंचायतींना सूचना, पशुसंगोपनची खबरदारी
बेळगाव : शहरासह ग्रामीण भागात पाणी समस्या गंभीर बनू लागली आहे. त्यामुळे जनावरांनाही पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली आहे. अशा परिस्थितीत ग्राम पंचायतींनी पाण्यासाठी हौद उभारावेत, अशा सूचना पशुसंगोपनने ग्राम पंचायतींना दिल्या आहेत. जिल्ह्यात 28 लाखांहून अधिक जनावरांची संख्या आहे. त्यामुळे पाळीव जनावरांना पाण्याची गरज आहे. सद्यस्थितीत जलाशय, तलाव व इतर जलस्त्राsतांच्या पाणीपातळीत घट झाली आहे. त्यामुळे जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होवू लागला आहे. जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावेत यासाठी ग्राम पंचायतींनी हौद निर्माण करावेत व त्यामध्ये टँकरद्वारे पाणी सोडावे, अशा सूचनाही केल्या आहेत.
चारा, पाण्यासाठी हालचाली सुरू
येत्या काही दिवसांत कडक उन्हाळ्यामुळे दुष्काळी भागात पाण्याची समस्या बिकट बनणार आहे. यासाठी पशुसंगोपनने खबरदारी म्हणून चारा, पाण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. जिल्ह्यात चाराटंचाई निर्माण झाल्यास चारा छावण्या निर्माण करण्याचीही तयारी चालविली आहे. त्याबरोबर माणसांबरोबर जनावरांनाही पाण्याची समस्या भेडसावू लागली आहे. जनावरांच्या पाण्यासाठी ग्राम पंचायतींने पुढाकारा घ्यावा, असे आवाहनही पशुसंगोपनने केले आहे. जिल्ह्यात गाय, म्हैस, बैल, शेळ्या, मेंढ्या आणि इतर जनावरांची संख्या मोठी आहे. मोठ्या जनावरांना दिवसाकाठी 50 ते 60 लीटर पाण्याची गरज भासते. दुष्काळी भागात पाण्याची कमतरता जाणवल्यास जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होणार आहे. विशेषत: दूध क्षमता कमी होणार आहे. यासाठी पशुसंगोपनने खबरदारी म्हणून जनावरांच्या पाण्यासाठी उपाययोजना हाती घेतल्या आहेत. ग्रामीण भागातील जनावरांसाठी ग्राम पंचायतींने हौद निर्माण करावेत आणि त्यामध्ये टँकरद्वारे पाणी सोडावे, अशी सूचनाही केली आहे.
ग्राम पंचायतींनी पाण्यासाठी हौद करावेत
यंदा पावसाचे प्रमाण घटल्याने सर्वत्र पाणी टंचाईचे संकट गडद होवू लागले आहे. मार्च प्रारंभापासूनच पाणी समस्या गंभीर बनू लागली आहे. काही भागात माणसांबरोबर जनावरांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. येत्या उन्हाळ्यात परिस्थिती आणखीन बिकट होणार आहे. यासाठी पशुसंगोपनने खबरदारी घेऊन जिल्ह्यातील ग्राम पंचायतींनी जनावरांच्या पाण्यासाठी हौद उपलब्ध करावेत, अशा सूचना केल्या आहेत. काही ग्राम पंचायतींनी अंमलबजावणी सुरू केली आहे. जनावरांना हौद उपलब्ध करून त्यामध्ये टँकरद्वारे पाणी सोडले जात आहे. त्यामुळे जनावरांना गावातच पिण्याचे पाणी उपलब्ध होवू लागले आहे.
ग्राम पंचायतींना हौद उपलब्ध करून द्यावेत
जनावरांना पाण्याची कमतरता पडू नये, यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्राम पंचायतींना हौद उपलब्ध करून द्यावेत. यासाठी सूचना पत्रक पाठविण्यात आले आहे. काही ग्राम पंचायतींनी हौद उपलब्ध केले आहेत. त्यामुळे जनावरांना पाणी उपलब्ध होवू लागले आहे. दुष्काळ परिस्थिती असलेल्या भागात तातडीने हौद उपलब्ध करावेत.









