कुंभारजुवे, सांतआंद्रे, सांताव्रुज, प्रियोळ : मतदारसंघातील पाणी पुरवठ्यावर परिणाम

फोंडा : ऐन उन्हाळ्यात व ओपा पाणी प्रकल्पाची पातळी खालावली असतानाच तिसवाडी, कुभारजुवे, सांताव्रुज, सांतआंद्रे, प्रियोळ भागात पाणीपुरवठा करणारी 750 कास्ट आयर्न (सीआय, बीड) ग्रीन लाईन जलवाहिनी कुंडई येथील कुंदील कंपनीजवळ फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. काल बुधवारी दुपारी ही जलवाहिनी फुटली. बुधवारी रात्रीपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत झाला नव्हता. जलवाहिनी दुरूतीचे काम युद्धपातळीवर सुरू असून आज दुपारपर्यंत जलपुरवठा सुरळीत करण्यात येईल. कुंडई येथे फुटलेली ही जलवाहिनी जीर्ण झाली होती. सुमारे 50 वर्षे जुनी जलवाहिनी जमिनीत बरीच खोलवर असल्याने दुरूस्तीकामासाठी विलंब लागत आहे. जेसीबीद्धारे खोदकाम केल्यानंतर जलवाहिनी जोडण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. पणजी शहर परिसरात पाणी पुरवठा सुरळीत राहणार आहे. तिसवाडी येथील ताळगांव, प्रियोळ येथील काही भागात, कुंभारजुवे, सांतआंद्रे, सांताव्रुज या भागातील पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. फोंडा पाणीपुरवठा विभागाचे अभियंता काशिनाथ सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली जलवाहिनी जोडणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.









