वृत्तसंस्था/ सेंट लुसिया
2024 च्या आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सुपर-8 फेरीतील इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात शिस्तपालन नियमाचा भंग केल्याबद्दल दक्षिण आफ्रिकेचा आक्रमक फलंदाज डेव्हिड मिलरला शिस्तपालन समितीकडून सक्त ताकीद देण्यात आली आहे.
इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील हा सामना सुरु असताना पंचांच्या निर्णयाविरुद्ध डेव्हिड मिलरने मैदानावर नापसंती दर्शविताना विचित्र हावभाव केले. गेल्या दोन वर्षांच्या कालावधीतील मिलरकडून हा पहिला गुन्हा नोंदविला गेल्याने त्याला आयसीसीकडून सक्त ताकीद देण्यात आली. दक्षिण आफ्रिकेच्या डावातील 19 व्या षटकात ही घटना घडली. सॅम करणच्या फुलटॉस टाकलेल्या चेंडूवर मिलर फटका मारण्याचा प्रयत्न केला. हा चेंडू बऱ्याच उंचीवरुन आल्याने पंच नोबॉल ठरवतील अशी अपेक्षा मिलरने बाळगली. पण पंचांनी तो नोबॉल दिला नाही. या निर्णयावर मिलरने नापसंती व्यक्त करताना विचित्र हावभाव केल्याचे आढळून आले.









