‘एनसीसी’च्या 250 कॅडेट्स-अधिकाऱ्यांचा समावेश
बेळगाव : ‘मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर’ने नुकतेच भारतीय संरक्षण दले आणि तऊण पिढी यांच्यातील सकारात्मक संवाद वाढविण्याच्या उद्देशाने एनसीसी डायरेक्टोरेट, कर्नाटक व गोवा यांच्या सुमारे 250 कॅडेट्स व अधिकाऱ्यांसाठी प्रेरक दौऱ्याचे आयोजन केले. या भेटीमध्ये भारतीय लष्कराच्या सामर्थ्याचे त्यांना दर्शन घडविण्यात आले. सैनिक आणि अधिकारी यांच्याशी संवाद साधण्याची, लष्करी उपकरणे आणि प्रात्यक्षिके पाहण्याची संधी त्यांना देण्यात आली. मराठा संग्रहालयाच्या समृद्ध वारशाबद्दल जाणून घेण्याची आणि शिस्त, धैर्य व देशसेवा ही मूल्ये कशी रुजवली जातात हे पाहण्याची संधीही त्यांना या निमित्ताने मिळाली. या भेटीचा सकारात्मक आणि प्रभावी परिणाम युवा कॅडेट्सच्या मनावर होऊन भारतीय लष्कराची मूल्ये आणि सामर्थ्य पाहून त्यांना अभिमान वाटला. त्यांनी स्वत:ला शिस्त लावून घेण्याचे वचन दिले, तसेच भविष्यात लष्करात दाखल होऊन मातृभूमीची सेवा करण्याची रुची दाखविली.









