तालुक्यात भगवेमय वातावरण : ठिकठिकाणी दौडचे भव्य स्वागत : सजीव देखावे ठरले आकर्षण
वार्ताहर/किणये
तालुक्यात दुर्गामाता दौड मोठ्या उत्साहात व जल्लोषात सुरू आहे. गावागावात सुरू असलेली दुर्गामाता दौड एकात्मतेचे दर्शन घडविणारी ठरत आहे. या दौडच्या माध्यमातून गावातील विविध तरुण मंडळे एकत्र येऊन ही दौड साजरा करताना दिसत आहेत. त्यामुळे तालुक्यात नवचैतन्य निर्माण झाले आहे. सोमवारी आठव्या दिवशी दुर्गामाता दौड मोठ्या उत्साहात पार पडली. बस्तवाड (हलगा) गावातील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शाखेच्या वतीने आठव्या दिवशी सोमवारी दुर्गामाता दौड मोठ्या जल्लोषात काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून या दुर्गामाता दौडची सुरुवात करण्यात आली. प्रारंभी प्रेरणामंत्र म्हणण्यात आले.
संभाजी गल्ली, साईनगर, होळी गल्ली, तहसीलदार गल्ली, नेताजी गल्ली, होसगेरी गल्ली, लक्ष्मी गल्ली, कलमेश्वर गल्ली, आदी गल्ल्यांमध्ये ही दौड निघाली. तानाजी गल्ली, विद्यानगर पहिला क्रॉस, दुसरा क्रॉस या ठिकाणी दौड आल्यानंतर विद्यानगर पहिला क्रॉस तानाजी गल्ली येथे या दौडचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. या दौडमध्ये विशेष पारंपरिक व ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवणारे देखावे साजरे करण्यात आले होते. महिला आरती ओवाळून दौडचे ठिकठिकाणी स्वागत करीत होत्या. गल्ल्यांमध्ये आकर्षक अशा रांगोळ्या घालण्यात आल्या होत्या. दुर्गामाता दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
हलगातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून दुर्गामाता दौडची सुरुवात
सोमवारी हलगा गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून दुर्गामाता दौडची सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन सागर कामानाचे, ध्वज पूजन युवराज कामानाचे, शस्त्रपूजन संभाजी हनमंताचे आदींच्या हस्ते करण्यात आले. दौडचे पूजन गजानन चौक नवी गल्ली येथील तरुणांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर दुर्गामाता दौड मार्गस्थ झाली. लक्ष्मी गल्ली, बस्ती गल्ली, मरगाई गल्ली, गणपत गल्ली, नवी गल्ली, शिवाजी गल्ली, महावीर गल्ली या गल्ल्यांमध्ये ही दौड फिरून सोमवारी कलमेश्वर मंदिर येथे सांगता करण्यात आली.
बेळगुंदी गावात सोमवारी दुर्गामाता दौड उत्साहात
तालुक्याच्या पश्चिम भागातील बेळगुंदी गावात सोमवारी दुर्गामाता दौड मोठ्या उत्साहात काढण्यात आली. गावच्या प्रवेशद्वाराजवळील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून या दौडला सुरुवात करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन आप्पाजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. अरुण गुरव, किशोर पाटील, रघुनाथ गावडा आदींच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामस्थ पंचकमिटीचे अध्यक्ष किरण मोटणकर हे होते. शिवाजी बोकडे, रामचंद्र पाटील, अशोक पाटील, ग्रामपंचायत अध्यक्ष प्रताप सुतार आदींच्या हस्ते ध्वज पूजन करण्यात आले.
तरुण-तरुणींचा लक्षणीय सहभाग
याप्रसंगी विविध देवदेवतांचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन विनोद पाटील यांनी केले. ध्येयमंत्र होऊन दौडला सुरुवात करण्यात आली. दौड हुतात्मा स्मारक येथे आल्यानंतर विनय कदम व ऋषभ पाटील आदींच्या हस्ते या दौडचे स्वागत करण्यात आले. गावडे गल्ली, चव्हाट गल्ली, ब्रह्मलिंग गल्ली, राकसकोप रोड, गणपत गल्ली आदी ठिकाणाहून ही दौड मोठ्या जल्लोषात काढण्यात आली. त्यानंतर पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दौडची सांगता करण्यात आली. या दौडमध्ये बेळगुंदी, बोकनूर, यळेबैल, सोनोली, राकसकोप, बिजगर्णी, कावळेवाडी आदी गावातील तरुण व तरुणींचा लक्षणीय सहभाग दिसून आला.









