बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांना देऊ केले जेवण
बेळगाव : फोन इन कार्यक्रमाच्या माध्यमातून बेळगावात लोकप्रिय बनलेले तत्कालीन जिल्हा पोलीस प्रमुख संजीव पाटील यांनी गृहमंत्री डॉ. जी परमेश्वर यांच्यासोबत अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना जेवण देऊ केले. त्यामुळे आयपीएस अधिकाऱ्यातील साधेपणा पुन्हा एकदा दिसून आला. बेळगावात सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनासाठी परजिह्यातून मोठा पोलीस फौजफाटा बंदोबस्तासाठी बेळगावात दाखल झाला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि पोलीस खात्याकडून सर्वांच्या राहण्यासह जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. चांगल्या दर्जाचे जेवण उपलब्ध करून देण्यासाठी सूचना करण्यात आली असून त्यानुसार मंत्री व अधिकाऱ्यांकडून सातत्याने जेवणाच्या दर्जाची पाहणी केली जात आहे.
त्याचबरोबर यापूर्वी बेळगाव जिह्यात सेवा बजावून गेलेल्या तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांनाही बंदोबस्तासाठी पाचारण करण्यात आले आहे. त्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. यापूर्वी बेळगाव जिह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून कर्तव्य बजावलेले संजीव पाटील हे देखील अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी बेळगावात दाखल झाले आहेत. फोन इनच्या माध्यमातून त्यांनी जिह्यातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य दिले होते. त्यामुळे जनसामान्यांत त्यांच्या प्रति आदराची भावना निर्माण झाली आहे. बंदोबस्तावरील पोलिसांना गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांच्यासोबत संजीव पाटील यांनी देखील पोलिसांना जेवण देऊ करून साधेपणाचे दर्शन एकदा घडविले. यावेळी राज्याचे पोलीस महासंचालक अलोक मोहन, अतिरिक्त पोलीस महासंचालक आर. हितेंद्र, पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांच्यासह इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते.









