सुधाकर काशिद/कोल्हापूर
पैशाची बॅग आणि त्या बॅगेसाठी चोरटय़ाचा पाठलाग हा प्रकार तसा काही नवा नाही. पण रविवारी रात्री पैशाची बॅग व एका अनोख्या पाठलागाचे थरार नाटय़ कोल्हापूर हुपरी रस्त्यावर घडले. या थरार नाटय़ातून माणुसकीचे वेगळे दर्शन समोर आले.
ही घटना रविवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. दिनेश पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार ते व त्यांची पत्नी पौर्णिमा हे आपल्या दोन वर्षाच्या कन्येला घेऊन हुपरीकडे चालले होते. त्यांच्या मागून एक मोटरसायकलस्वार आला व पुढे काही अंतरावर त्या मोटरसायकलस्वाराची बॅग रस्त्यावर पडली. दिनेश पोवार व त्यांच्या पत्नीने आपली मोपेड थांबवून ही बॅग उचलली. व ही बॅग पुढे गेलेल्या मोटरसायकल स्वाराची हे माहित असल्याने बॅग देण्यासाठी त्यांनी त्या मोटरसायकल स्वाराचा पाठलाग सुरू केला. आपण पाठीमागून येतोय हे त्या मोटरसायकल स्वाराला कळावे म्हणून सतत हॉर्न वाजवत राहिले. पण त्या मोटरसायकलस्वाराला ते गाठू शकले नाहीत.
हा पाठलाग अडीच तीन किलोमीटर चालला. पुढे एका वळणावर मोटरसायकलस्वाराला आपल्या मागून मगापासून कुणीतरी हॉर्न वाजवून व अधूनमधून ओरडत येत असल्याचा अंदाज आला. व त्या मोटरसायकल स्वाराने आपली मोटरसायकल रस्त्याकडेला थांबवली.दिनेश पवार व त्यांच्या पत्नीने त्या मोटरसायकलस्वाराला त्यांच्याकडील बॅग दाखवली. व रस्त्यावर पडलेली ही बॅग तुमचीच असल्याने तुम्हाला गाठण्यासाठी तुमच्या पाठोपाठ आम्ही येत होतो असे सांगितले. ही बॅग पाहून तो मोटरसायकलस्वार मटकन खालीच बसला. थोडा वेळ शांत राहून तो मोटरसायकलस्वार म्हणाला, या बॅगेत काय आहे ते तुम्ही बघितले का? पवार दाम्पत्यांनी नाही असे सांगितले. मग त्या मोटरसायकलस्वाराने बॅग उघडली व आतील साहित्य पाहून बॅगेत तीन लाख रुपये होते व ते जसेच्या तसे आहेत असे म्हणत अक्षरशः त्या दोघांना हात जोडले. त्या मोटरसायकल स्वाराने आभार मानता मानता आपल्याकडून पाच हजार रुपये प्रेमाची भेट म्हणून घेण्याची विनंती केली. पण ती विनंती नम्रपणे पवार दांपत्याने नाकारली व आपल्या मोपेडला किक मारली.
आम्ही आमचं कर्तव्य पार पाडलं
आम्ही बॅग परत देऊन फार मोठी कामगिरी केली असे वाटत नाही. आम्ही आमचे कर्तव्य मात्र नक्कीच पार पाडले. व बॅग देताना काही पोलीस अधिकाऱयांना या घटनेची कल्पनाही दिली व संबंधिताला त्याची बॅग परत केली. बॅग परत मिळताच व त्यातील पैसे आहेत तसे आहेत हे जाणवताच संबंधितांच्या चेहऱयावर जे समाधानाचे हास्य फुलले ते अजूनही आमच्या डोळ्यासमोर आहे. व तेच आम्हाला आमच्या जीवनात महत्त्वाचे आहे.असं दिनेश पोवार यांनी सांगितलं.









