इंग्लंडहून परतताच योगेश आलेकरी यांनी डॉ. पतंगराव कदम यांच्या स्मारकाचे घेतले दर्शन
by सुनिल सरोवे
वांगी : पलूस–कडेगाव हे माझं कुटुंब आहे, आणि मी इथल्या प्रत्येकाचा कुणाचा मुलगा, कुणाचा भाऊ असून प्रत्येक कुटुंबाचा सदस्य आहे. या मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीचं संरक्षण करणे ही माझी जबाबदारी आहे, आणि ती नेहमी पूर्ण ताकतीने पार पाडीन, असा शब्द पलूस–कडेगाव ची माती कपाळावर लावत आ. डॉ. विश्वजीत कदम यांनी कडेगावच्या जाहीर सभेत प्रचंड जनसमुदायास साक्षी मानून दिला होता. आणि तो शब्द पूर्ण करण्यासाठी आ. डॉ. विश्वजीत कदम हे दिवस–रात्र काम करत आहेत.
महापूर, दुष्काळ किंवा कोरोना सारख्या आपतकालीन परिस्थितीत अनुभव सगळ्यांनी घेतला आहे. मतदारसंघातील लोकांवर कोणतंही संकट येऊ द्या, त्या संकटपुढे या मतदारसंघाचे आमदार कदम हे पुढे असतात हे त्यांनी नेहमीच दाखवून दिले आहे, त्याचा प्रत्यय आता पुन्हा आला आहे, करांडेवाडी येथील युवक योगेश आलेकरी हा मोटारसायकल वरून जगभ्रमंती करत आहे.
सन २०२३ मध्ये त्याने याची सुरुवात करून प्रवासाचा पहिला टप्पा पूर्ण देखील केला व आता सन २०२५ मध्ये त्याने दुसऱ्या टप्पा सुरू केला त्यामध्ये २५ हजार किलोमीटरचे अंतर त्याने पार केले, आणि आपल्या प्रवासादरम्यान हा युवक इंग्लंडमध्ये पोहोचला, मात्र नॉटिंगहॅममध्ये त्यांच्या बाईकसह सर्व कागदपत्रे, कपडे व इतर साहित्य चोरीला गेले. आता पुढे काय व यातून कसे सावरायचे हा प्रश्र त्याच्यासमोर होता, योगेश मोठ्या चिंतेत होता, ही बातमी आमदार कदम यांना समजताच त्यांनी स्वतः योगेश आलेकरी यांना संपर्क केला व काळजी करू नका, मी आहे, असा धीर दिला व आपल्या मित्रांच्या मदतीने योगेश आलेकरी यांना सर्वतोपरी मदत केलीच व त्यांना त्याठिकाणी आर्थिक मदतही केली.
याबाबत योगेश आलेकरी सांगतात, ज्यावेळी इंग्लड मध्ये माझी बाईक चोरीला गेली, त्यावेळी आता काय? असा प्रश्र होता, आता हे सगळं सोडून कसं बस गावाला येणे व हा जगभ्रमंती प्रवास सुद्धा सोडून देणे हा एकच मार्ग होता, परंतु आ. कदम यांचा फोन आला, आणि सगळं बदलूनच गेलं, आपल्या मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीवर लक्ष्य ठेवून त्यांना अडचणीतून बाहेर काढणारे हे नेते आहेत, माझ्यावर ज्यावेळी हा प्रसंग आला
त्यावेळी मी पूर्ण रिकामा होता, पण माझी सगळी सोय ती ही सातासमुद्रापार इंग्लड याठिकाणी कदम साहेबांनी लावून दिली ही खूप मोठी गोष्ट आहे. अजूनही माझा ३५ हजार किलोमीटर प्रवास शिल्लक आहे, पण पुढच्या प्रवासास त्यांनी शुभेच्छा दिल्या असून कोणत्याही अडचणीत मदत करण्याचे आश्वस्त केले आहे. आता आ.कदम यांची ताकत माझ्यासोबत असून जगाच्या पाठीवर कोठेही ही ताकद मला बळ देण्यास सक्षम आहे.








