देशातील सर्वात अनोखे गाव
राजस्थानातील एका गावातील लोकांनी धर्म आणि जातीचा मुद्दा बाजूला ठेवला आहे. या गावातील अनेक गोष्टी वैशिष्टय़पूर्ण आहेत, परंतु यातील सवांत विशेष बाब म्हणजे येथील लोक स्वतःच्या नावानंतर एकाच आडनावाचा वापर करतात. येथे हिंदू तसेच मुस्लीम धर्मीय देखील स्वतःच्या नावानंतर एकच आडनाव लावतात. या सर्व लोकांच्या अधिकृत दस्तऐवजातही हाच प्रकार आहे. या गावाचे वैशिष्टय़ म्हणजे येथील बहुतांश जण हे जिल्हय़ातील अनेक शाळांमध्ये क्रीडाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. या गावाला क्रीडाशिक्षकांचे गाव म्हणून देखील ओळखले जाते.

ईनाणियां आडनाव
या गावाचे नाव ईनाणा असून ते राजस्थानच्या नागौर जिल्हय़ात आहे. ईनाणा गावात राहणारे सर्व जाती आणि धर्माचे लोक मग ते हिंदू असो किंवा मुस्लीम सर्वजण ईनाणियां याच आडनावाचा वापर करतात. 1358 मध्ये शोभराज नावाच्या व्यक्तीचा पुत्र इंदरसिंहने हे गाव वसविल्याचे सांगण्यात येते. त्यावेळी 12 गावांमध्ये 12 जाती होत्या आणि सर्वांना मिळून ईनाणा तयार झाले. हे नाव देखील इंदरसिंह यांच्या नावावरच आधारित आहे. तेव्हापासुन सर्व लोक स्वतःच्या आडनावाच्या ठिकाणी ईनाणियां असे लिहित आले आहेत.
अनेक गोष्टींना मज्जाव
या गावाची लोकसंख्या 10 हजारांच्या आसपास आहे. या सर्व लोकांच्या अधिकृत दस्तऐवजांमध्ये नावापुढे ईनाणियां हेच आडनाव लावले जता आहे. याचबरोबर गावात अनेक वैशिष्टय़पूर्ण गोष्टी आहेत. या गावात कधीच वाद होत नाहीत तसेच कुणीच मद्यप्राशन करत नाही. मद्यप्राशन केल्याचे आढळून आल्यावर 11 हजार रुपयांचा दंड ठोठावण्याची तरतूद आहे. तसेच गावात गुटखा तसेच धूम्रपानाच्या गोष्टी मिळत नाहीत. गावात डीजे वाजविण्यास मनाई आहे. तसेच येथे दिवाळीवेळी पटाके नाममात्र प्रमाणात वाजविण्याची अनुमती आहे.









