विसर पडणे मोठी घटना ठरत नाही. परंतु विसरण्याची सवय किंवा आजार असल्यास माणसाचे जीवन मोठ्या प्रमाणावर प्रभावित होते. विस्मृतीचा आजार असलेल्या लोकांसाठी विशेष ठिकाण असेल तर त्यांना किती मदत होईल याचा विचार करा. अशाच एका गावात राहणाऱ्या लोकांना काहीच आठवत नाही, ते रस्ते आठवू शकत नाहीत तसेच दुकानात पैसे देऊन काही खरेदी करू शकत नाहीत. अशा स्थितीत या लोकांना सर्वकाही मोफत दिले जाते. हे गाव युरोपीय देश फ्रान्समध्ये असून दुसऱ्या ठिकाणांपेक्षा अत्यंत वेगळे आहे. लँडेस नावाच्या या गावात प्रत्येक नागरिक विस्मृतीचा आजार म्हणजेच डिमेंशियाने ग्रस्त आहे. येथील सर्वात वृद्ध नागरिकाचे वय 102 वर्षे आहे. तर सर्वात कमी वयाचा व्यक्ती 40 वर्षांचा आहे. या गावाची निर्मिती विशेषकरून डिमेंशियाने ग्रस्त लोकांसाठीच करण्यात आली आहे. हे प्रयोगशील गाव बोर्डो विद्यापीठाच्या संशोधकांच्या देखरेखीत असते. हे संशोधक दर 6 महिन्यांनी येथे येतात आणि लोकांच्या प्रगतीची पडताळणी करतात. येथे एकूण 120 लोक राहत असून इतक्याच संख्येत वैद्यकीय तज्ञ या गावात आहेत.
पैशांची गरज नाही
येथे राहणाऱ्या लोकांना पैसे बाळगण्याची कुठलीच गरज नाही. गावाच्या चौकात एक जनरल स्टोअर असून तेथे सर्व गोष्टी मोफत मिळतात. दुकानासोबत रेस्टॉरंट, थिएटर आणि बऱ्याच सुविधा येथे आहेत. या गावातील रहिवाशांचे कुटुंब त्यांच्या येथील वास्तव्याकरता सुमारे 25 लाख रुपयांचे शुल्क भरतात. फ्रान्सचे सरकार देखील या गावाकरता 179 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी देते.









