दक्षिण गोव्यातून रोज येतोय 450 टोपल्या आंबा : सर्व आंब्यांमध्ये मानकुरादला पहिली पसंती
महेश कोनेकर : आंब्याचा हंगाम सुरू झाला की, दररोज भल्या पहाटे मडगावच्या पिंपळकट्ट्याजवळ आंब्यांचा बाजार भरतो. सध्या दररोज सुमारे 400 ते 450 टोपल्या (पाटी) आंबे मडगावच्या बाजारपेठेत येतात. त्यात एकूण 16 प्रकारच्या आंब्यांचा समावेश असून त्यात सासष्टीतील आंब्यांचा देखील समावेश असल्याची माहिती राजेश नाईक यांनी दिली. नाईक हे मडगाव मार्केटमधील आंब्याचे प्रमुख व्यापारी आहेत. 16 प्रकारच्या आंब्यांमध्ये मानकुरादला खऱ्या अर्थाने सर्वांची पसंती आहे. सध्या मानकुरादचा दर 800 ते 1800 पये प्रतिडझन असा आहे. यंदा सर्वप्रथम फेब्रुवारी महिन्यात आंबा मडगावच्या बाजारपेठेत दाखल झाला होता. अजून मानकुराद मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत दाखल व्हायचा बाकी आहे. मे महिन्याच्या सुरवातीला मानकुराद मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता वर्तविली जात असून त्यावेळी दर काही प्रमाणात नियंत्रणात येईल. यंदा फेब्रुवारी महिन्यापर्यंत थंडी लांबल्याने आंब्याचा हंगाम उशिरा सुरू झाला. हा हंगाम जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालणार आहे. त्यानंतर शेजारील राज्यातून आंब्याची आवक सुरू होणार आहे. मडगावच्या बाजारपेठेत मानकुराद, हापूस, मुसाराद (सासष्टीचा), शावियर, साखरी (गावठी), मालदेस, पायरी, बॉल (सासष्टी), फुर्ताद, दैयराद, मल्लिका, केसर, रत्ना, हुडगो तसेच गावठी घोठा दाखल झालेली आहेत. फर्नाद अजून बाजारात यायचा बाकी आहे.
नैसर्गिक प्रक्रियेने पिकविलेले आंबे
विशेष म्हणजे मडगाव बाजारपेठेत खास करून पिंपळकट्ट्याजवळ येणारा आंबा हा नैसर्गिक प्रक्रिया करूनच पिकविलेला आंबा असतो. गोव्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी नैसर्गिक पद्धतीनेच आंबा पिकविण्यावर भर दिलेला आहे. रसायनापासून हे पारंपरिक आंबा उत्पादक शेतकरी दूर आहे. आंब्याची चव व स्वाद तसेच मनाला भुरळ पाडणारा सुगंध हे मडगावच्या बाजारपेठेतील वैशिष्ट्या आहे.
सकाळी भरतो आंब्यांचा बाजार
मडगावच्या पिंपळकट्ट्याजवळ मध्यरात्री 2 वाजल्यापासून आंबे घेऊन येणारी वाहने दाखल होत असतात. सकाळी 8.30 ते 9 वाजेपर्यंत आंब्याचा बाजार भरतो. या ठिकाणाहून फोंडा, वास्को, सावर्डे तसेच इतर भागात आंबा विक्रेते आंबा घेऊन जात असतात. मडगावात जवळपास 6 प्रमुख आंबा व्यापारी आहेत. राजेश नाईक हे आपल्या वडिलापासून या व्यवसायात कार्यरत असून त्यांची पत्नी रिचा व मुलगा पद्दमय देखील त्यांना मदत करण्यासाठी पहाटे बाजारपेठेत येत असतात. त्याचे बंधू ही याच व्यवसायात कार्यरत आहे. कोविड महामारीच्या काळात सर्वांनाच संघर्ष करावा लागला होता. त्यात आंबा व्यापारी तसेच शेतकऱ्यांची देखील परिस्थिती वाईट झाली होती. आंब्याच्या झाडावर आंबे होते पण काढणारी माणसे मिळत नव्हती. आंबा बाजारत आला तरी खरेदी करणाऱ्या व्यक्ती नव्हत्या. कोविड नियंत्रणात आला व गेल्या वर्षापासून पुन्हा एकदा आंब्याचा बाजार फुलू लागल्याची माहिती राजेशने दिली.
आंबे व दर प्रति डझनप्रमाणे
- मानकुराद रु. 800 ते 1800
- हापूस रु. 400 ते 600
- मुसाराद रु. 300 ते 800
- शावियर रु. 350 ते 450
- साखरी रु. 400 ते 450
- मालदेस रु. 400 ते 450
- पायरी रु. 300 ते 450
- बॉल रु. 500
- फुर्ताद रु. 250 ते 350
- दैयराद रु. 350 ते 400
- मल्लिका रु. 150
- केसर रु. 100
- रत्ना रु. 120
- हुडगो रु. 350 ते 400