विवाह न होण्याचे कारण चकित करणारे
जगात अनेक ठिकाणी महिलांची संख्या कमी असल्याने अनेक पुरुषांना जोडीदार मिळत नसल्याचे तुम्ही ऐकले असेल. काही वर्षांपूर्वी पर्यंत हरियाणा आणि राजस्थानात काही ठिकाणी हे चित्र दिसून येत होते. तेथे स्रीभ्रूण हत्येमुळे मोठे संकट उभे ठाकले होते. परंतु एका गावात शेकडो अविवाहित युवती आहेत, या युवतींना विवाहासाठी युवक मिळत नसून यामागील कारण अत्यंत विचित्र आहे.
ब्राझीलमध्ये नोइवा दो कोरडेएरो नावाचे गाव आहे. येथे 20-35 वयोगटातील सुमारे 600 युवती आहेत. या युवतींना विवाहासाठी जोडीदार मिळत नसल्याची स्थिती आहे. या गावात अविवाहित पुरुष मिळणे अत्यंत अवघड आहे. या गावात जितके पुरुष आहेत ती एक तर विवाहित आहेत किंवा अविवाहित युवतींचे नातेवाईक आहेत. यामुळे त्यांचा विवाह होऊ शकत नाही. युवतींचा विवाह न होण्याचे दुसरे कारण चकित करणारे आहे.
सर्वसाधारणपणे विवाह झाल्यावर युवती पतीच्या घरी राहण्यासाठी जातात, परंतु ब्राझीलच्या या गावात युवती विवाहानंतरही याच गावात राहू इच्छितात. बहुतांश युवतींची इच्छा विवाहानंतर पतीने या गावात राहून येथील नियम-कायद्यांचे पालन करावे अशी आहे. यामागे 1995 मध्ये महिलांकडून निर्माण करण्यात आलेला एक नियम आहे. याच्या अंतर्गत येथील महिला पुरुषांकडून निश्चित नियमांना मानत नाहीत. या महिला स्वत:च्या अटींवर जीवन जगू इच्छितात, विवाह न होण्याचे एक कारण हे देखील आहे.









