कोरोना रुग्णात झपाट्याने वाढ : नव्याने 108 बाधित
प्रतिनिधी / पणजी
गेल्या पंधरवड्यापासून गोव्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून गेल्या 24 तासात 108 नवीन बाधित सापडले आहेत. तर 1 रुग्णाचा बळी गेल्यामुळे कोरोना पुन्हा एकदा हातपाय पसरत असल्याचे समोर येत आहे. गोव्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 453 झाली असून काल गुरुवारी 7 जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. राज्यात होणारी कोरोना रुग्णवाढ चिंताजनक असून त्याची अजून तरी सरकारने किंवा आरोग्य खात्याने गंभीर दखल घेतली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
एकूण बळींची संख्या 4014
गेल्या 24 तासात 959 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली त्यात 108 जणांना बाधा झाल्याचे दिसून आले. त्यातील 101 जणांना गृह विलगीकरण देण्यात आले असून 7 जणांना हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली आहे. अनेक महिन्यानंतर कोरोनाचा एक बळी गेल्याची नोंद झाली असून एकूण बळींची संख्या 4014 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासात एकूण 16 रुग्ण बरे झाले असून 3 जणांना हॉस्पिटलमधून घरी पाठवण्यात आले आहे.
आरोग्य खात्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास एक वर्षाच्या कालावधीनंतर गोवा राज्यात कोरोनाचा रुग्ण बळी पडला असून गेल्या आठवडाभरात प्रतिदिन दुहेरी संख्येने कोरोनाचे नवीन रुग्ण वाढल्याचे समोर आले आहे. गोव्यात गेले वर्षभर कोरोनाचा बळी नसल्याने त्याची फारशी धास्ती कोणी घेतली नाही. किरकोळ रुग्ण मिळत होते आणि ते लगेच बरेही होत होते. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज भासत नव्हती परंतु आता कोरोनाचा बळी गेल्यामुळे व काही रुग्णांना हॉस्पिटलमध्ये नेल्यामुळे कोरोनाची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे.
लसीकरणही बंद
गोव्यातून कोरोनाचा प्रसार जवळपास संपुष्टात आला होता. बळी तर नव्हतेच परंतु अनेक दिवस रुग्णही मिळत नव्हते. त्यामुळे कोरोना एकदाचा संपला अशी भावना निर्माण झाली होती. तथापि आता गेल्या एक दोन महिन्यात कोरोनाने पुन्हा एकदा गोव्यात डोके वर काढले असून आरोग्य केंद्रात लसी नसल्याने लसीकरणही बंद पडले आहे. लसींची मागणी केंद्राकडे करण्यात आली असली तरी ती पूर्ण झालेली नाही.
सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर नाही
गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, मास्क घाला असे आवाहन सरकारतर्फे आरोग्य खात्याने केले असले तरी त्याची फारशी दखल लोकांनी घेतलेली नाही. फक्त हॉस्पिटल्स, आरोग्य केंद्रांत, दवाखाने याच ठिकाणी मास्क घातलेले दिसतात. सार्वजनिक ठिकाणी बसमध्ये अजूनही मास्कधारी दिसत नाहीत.
पर्यटकांचाही मुक्तपणे वावर
दोन वर्षांपूर्वी मार्च, एप्रिलमध्ये गोव्यासह देशात कोरोनामुळे लॉकडाऊन करण्याची पाळी आली होती. देशभरात कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत असून गोव्याशेजारील महाराष्ट्र, कर्नाटकमध्येही कोरोनाचा प्रभाव आहे. गोव्यात येणारे पर्यटक मास्कशिवाय मुक्तपणे फिरत असल्याचे दिसत असून मास्कचा वापर अत्यंत कमी प्रमाणात होत असल्याचे पहावयास मिळते.









