न्हावेली / वार्ताहर
A unique tradition of Malgaon village
शिमगोत्सवाच्या सातव्या दिवशी घरोघरी फिरविण्यात आला देवाचा कळस
मळगाव गावात दरवर्षीप्रमाणे आज शिमगोत्सवाच्या शेवटच्या म्हणजेच सातव्या दिवशी गावातील प्रत्येक घरोघरी देवाचा कळस फिरविण्यात आला. घरी आलेल्या कळसाचे ग्रामस्थांनी पारंपरिक रिवाजाप्रमाणे भक्तिभावाने पूजन केले.मळगाव गावात दरवर्षी शिमगोत्सवाच्या सातव्या दिवशी गावातील प्रत्येक घरात देवाचा कळस फिरविण्याची परंपरा आहे. ही परंपरा हे गाव गेली अनेक वर्ष जपत आले आहे. गावाची लोकसंख्या जास्त असल्याने दरवर्षीप्रमाणे पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास कळस गावात फिरविण्यास सुरुवात करण्यात आली. त्याअगोदर कुळघरापासून सवाद्य वाजतगाजत मिरवणूक गावातील पंचायतन श्री देव रवळनाथ मंदिरात नेण्यात आली. तेथे देवाला गाऱ्हाणे घालून नैवैद्य दाखविण्यात आला. तीर्थप्रसाद वाटप झाल्यावर तेथून मिरवणूक गर्द वनराईत असलेल्या मायापूर्वचारी व तेथून भूतनाथ मंदिरात गेल्यावर तिथेही देवाला गाऱ्हाणे घालून त्यानंतर कळस गावात फिरविण्यास सुरुवात करण्यात आली. गावातील राऊळ व गावकर हे मानकरी संपूर्ण गावात अक्षरशः धावत जाऊन हा कळस सायंकाळी पाच वाजेपर्यंत फिरवून पूर्ण करतात. या धार्मिक कार्यात तरुण मंडळी सहभागी झाली होती. त्यानंतर सायंकाळी गावातील वाडीवाडीतील एकत्रित गाव रोंबाट श्री देव रवळनाथ मंदिरासमोरील होळीजवळ जाऊन शिमगोत्सवाची सांगता केली जाते. यावर्षीही सायंकाळी सात दिवसांच्या शिमगोत्सवाची सांगता केली जाणार आहे.









