पालीच्या पाठीवरही खवले
वन्यजीव संरक्षण आणि संशोधन सोसायटी तसेच बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या संशोधकांनी सरीसृप क्षेत्रात महत्त्वपूर्ण शोध लावला आहे. तामिळनाडूतील मदुराई जिल्ह्यात पालीच्या डेमिडॅक्टीलस प्रजातीतील एक नवी प्रजाती या संशोधकांनी शोधून काढली आहे. यासंबंधीचे संशोधन एशियन जर्नल ऑफ कॉन्झर्व्हेशन बायोलॉजी या नियतकालिकात प्रकाशित झाले आहे.

नवीन प्रजातीवर संशोधक अमित सय्यद यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अध्ययन केले आहे. सय्यद हे वन्यजीव संरक्षण आणि संशोधन सोसायटीचे संशोधक आहेत. नवीन प्रजातींची अचूक ओळख आणि वर्गीकरण सुनिश्चित करण्यासाठी संशोधकांनी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि पद्धतींचा वापर केला आहे. या नवीन प्रजातीचे नाव ‘हेमिडाक्टाइलसमुल्टिसकाटस’ आहे.
तामिळनाडूतील नागमलाई हिल्समध्येच ही विशिष्ट पाल आढळते. ही पाल पूर्णपणे दगडांच्या पठारावर राहते. तसेच आजूबाजूच्या वस्तीतील घरांच्या भिंतींवर देखील आढळते. या पालीच्या पाठीवरचे खवले अत्यंत वेगळे आहेत. समुद्री शिंपल्यासारखे ते दिसतात. त्या भागातील पक्षी, साप इतर किटक अशा जैवविविधेत या पालीची भूमिका महत्त्वाची आहे.
मदुराई जिल्ह्यात हेमिडाक्टाइलसच्या या नव्या प्रजातीचा शोध लागणे आमच्यासाठी आनंददायी असल्याचे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे उपसंचालक राहुल खोत यांनी म्हटले आहे. या शोध जैवविविधता संवर्धनाच्या पुढील संशोधनाचे महत्त्व अधोरेखित करणारा आहे.









