साके प्राथमिक शाळेत पहिलीच्या विद्यार्थ्यांचा स्वागताचा अनोखा उपक्रम
व्हनाळी : वार्ताहर
जून महिना उजाडला की विद्यार्थ्यांना शाळेचे वेध लागतात. मे महिन्यांच्या सुट्टीनंतर कधी एकदा शाळेत जातोय, मित्र मैत्रीणींना भेटतोय, सुट्टीत केलेली मजा सांगतोय, एकत्र डबा खातोय असं प्रत्येक विद्यार्थ्याला वाटत असतं. शाळेचा पहिला दिवस म्हणजे नव्या युनिफॉर्मसोबतच नवे मित्र ,नव्या शिक्षकांची भेट होणं. त्यामुळे विद्यार्थ्यामध्ये एक उत्साह असतो. दरम्यान इयत्ता पहिलीला प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांचे शाळेतील पहिले पाऊल आज पडले. त्यानिमित्त विद्या मंदिर साके ता.कागल या शाळेमार्फत पहिलीच्या विद्यार्थ्यांची गावातून शाळेपर्यंत रथातून वाजत गाजत लेझीमिच्या तालावर भव्य मिरवणूक काढून विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
प्रवेशद्वार फुगे, फुलांनी सजविले होते. लेझिम, ढोलताशांच्या गजरात पुष्पवृष्टी करत विद्यार्थ्यांचं अनोखं स्वागत करण्यात आलं. या अनोख्या स्वागताने नवागत भारावून गेले. विद्यार्थ्यांना वही पेन देण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये देखील उत्साह दिसून येत होता. पहिल्यांदाच हे विद्यार्थी शाळेची पायरी चढले होते. पहिल्याचं दिवशी भीतीने चिमुकल्यांचे रडणे आणि शिक्षकांचं समजावणे, त्यातचं मुलांचा किलबिलाट यामुळे शाळा गजबजून गेल्याचं दिसून आलं. यावेळी शाळा समितीचे अध्यक्ष सुभाष चौगले,सारिका निऊंगरे,वर्षाराणी घराळ,मुख्याध्यापक भानूदास पोवार, शिक्षिका विद्या पोवार, सुनिल पोवार, दत्ता पाटील,प्रकाश मगदूम, विजय पाटील सदस्य, सर्व शिक्षक, पालक उपस्थीत होते.
शाळेची घंटा आणि किलबिलाट…
गेल्या दिड दोन महिन्यांपासून विद्यार्थ्याविना शांत-शांत असलेल्या शाळेत आज इतक्या दिवसांनी घंटेचा निनाद एकायला आला मुलांचा किलबिलाट आणि ताट वाट्यांच्या आवाजाने त्यातच नवागतांच्या स्वागतांची भर यामुळे शाळा आणि परिसरात उत्साह संचारला होता.