एक लाख विद्यार्थी घेणार सहभाग : मुख्यमंत्री साधणार थेट संवाद : वेबिनार माध्यमातून शाळा, पंचायतींमध्ये व्यवस्था
प्रतिनिधी / पणजी
नियोजन, सांख्यिकी आणि मूल्यमापन संचालनालयातर्फे सुरू करण्यात आलेल्या ’स्वयंपूर्ण गोवा 2.0 कार्यक्रमांतर्गत राज्यातील सुमारे एक लाख विद्यार्थ्यांना वेबिनारच्या माध्यमातून करिअर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. उद्या दि. 18 जून रोजी हा कार्यक्रम होणार असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत या विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहेत.
गुरुवारी पर्वरीत आयोजित पत्रकार परिषदेत नियोजन खात्याचे संचालक विजय सक्सेना यांनी ही माहिती दिली. त्यावेळी शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांचीही उपस्थिती होती. राज्य तसेच केंद्र सरकारची प्रत्येक योजना समाजातील निम्न स्तरावरील घटकांपर्यंत पोहोचवावी आणि त्यापासून कुणीच वंचित राहू नये या उद्देशाने ’स्वयंपूर्ण गोवा 2.0 कार्यक्रम’ सुरू करण्यात आला आहे, असे सक्सेना म्हणाले.
याच कार्यक्रमाचा भाग म्हणून, मुख्यमंत्री उद्या 18 जून रोजी करिअर मार्गदर्शनावर विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. त्यात विद्यार्थ्यांसह त्यांचे पालकही सहभागी होऊ शकणार आहे, असे सक्सेना यांनी सांगितले.
सकाळी 11 वाजता सुरू होणाऱया या वेबिनारमध्ये 538 हायस्कूलमधील इयत्ता आठवी ते दहावीपर्यंतचे सुमारे 70 हजार विद्यार्थी आणि 112 उच्च माध्यमिक विद्यालयांमधील सुमारे 30 हजार विद्यार्थी सहभागी होतील. त्यासाठी सर्व हायस्कूल आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये तसेच पालकांच्या सोयीसाठी प्रत्येक ग्रामपंचायतींमध्येही कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात येणार आहे.
या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे यासाठी शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी गुरुवारी परिपत्रक जारी केले आहे. त्यात इयत्ता आठवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना हा कार्यक्रम पाहण्यासाठी त्यांच्या संबंधित शाळांमध्ये तसेच पालकांना उपस्थित राहण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायत कार्यालयात व्यवस्था करण्यात आली असल्याचे कळविण्यात आले आहे.








