भारत-कुवेत संबंधामध्ये एक नवा अध्याय लिहिला जात आहे. 43 वर्षापूर्वी भारताच्या पंतप्रधानांनी कुवेतला भेट दिली. त्यानंतर प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 दिवसांचा कुवेत दौरा केला. त्यामुळे कुवेतमध्ये राहणाऱ्या अनिवासी भारतीयांच्या मनात एक विश्वास निर्माण झाला. शिंपल्यातून मोती शोधावेत तसे हे कुवेत भेटीचे रहस्य आहे. कुवेतचे हे मोती सुरतच्या हिऱ्याबरोबर चमकत राहतील.
माणिक मोत्यांच्या व्यापारासाठी कुवेत प्रसिद्ध आहे आणि सुरतचे हिरे जगात लखलखत असतात. भारत-कुवेत मैत्री म्हणजे कुवेतच्या शिंपल्यातील मोती आणि सुरतेच्या हिऱ्यामुळे लखलखणारी मैत्री आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दोन दिवसांचा (21-22 डिसेंबर) कुवेत दौरा अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण ठरला आहे. एक म्हणजे 2014 मध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीने सत्ता ग्रहण केल्यानंतर आखाती देशांशी भारताचे संबंध कसे असतील याबद्दल अनेकांना प्रश्नचिन्ह पडले होते. परंतु गेल्या 10 वर्षात न भूतो न भविष्यती असे प्रयत्न करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आखाती देशांशी आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक संबंध एका वेगळ्या उंचीवर नेले आहेत. त्यांचा कुवेत दौरासुद्धा उभय देशातील संबंधांच्यादृष्टीने एक नवा वळण बिंदू ठरला आहे. या दौऱ्याचे वैशिष्ट्या म्हणजे त्यातील विविध सामंजस्य करार आणि परस्पर सहकार्याचे अभिवचन हे लोक-लोक संपर्कावर भर देणारे आहे. कुवेतमधील भारतीय समुदायासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण भारताच्या प्रगतीचा चढता आलेख स्पष्ट करणारे आहे. 1981 साली माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या कुवेत भेटीनंतर 43 वर्षांनी प्रथमच नरेंद्र मोदी यांनी कुवेतला भेट दिली. तसे विमान प्रवासाचे अंतर 4 तासांचे पण पंतप्रधानांना कुवेत भेटीला 43 वर्षे लागली. असा मार्मिक उल्लेख मोदी यांनी त्यांच्या भाषणात केला.
भारत आणि कुवेत यांचे संबंध सागरी संबंध आहेत, व्यापारी संबंध आहेत आणि सांस्कृतिक संबंध आहेत. कोरोना काळामध्ये कुवेतला भारताने प्रतिबंधक लसीचा पुरवठा केला आणि कुवेतनेसुद्धा भारतामधील टंचाई लक्षात घेऊन लिक्विड ऑक्सिजन म्हणजे द्रवरूप प्राणवायूचा मोठ्या प्रमाणात पुरवठा केला होता. त्यामुळे कुवेतमध्ये एक म्हण आहे, तुम्हाला जेव्हा गरज पडेल तेव्हा तुम्ही खुशाल भारताकडे मदतीची हाक द्या म्हणजे तुम्हाला मदत नक्कीच मिळेल. भारताने आपल्या देशात फायबर ऑप्टीक लाईन इतकी प्रभावीपणे वाढविली आहे की भारत आणि चंद्रा दरम्यान अंतराच्या आठपट हे फायबर ऑप्टीकचे प्रमाण आहे. मंगळ, चंद्र व सूर्यावरील भारताच्या अंतराळ संशोधन योजनेचे जगभरातील अनिवासी भारतीयांना कौतुक वाटते
मंत्रवत विचारांचे प्रदर्शन?
भारतीय समुदायासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण म्हणजे मंत्रवत अभिव्यक्ती होय. त्यांनी आपल्या भाषणामध्ये तीन मुद्दे प्रामुख्याने मांडले. पहिला म्हणजे भारतीय लोकांनी आखाती देशामध्ये जाऊन केलेल्या प्रगतीमुळे भारताची प्रतिष्ठा उंचावली आहे. दुसरे म्हणजे भारत आणि आखाती देशातील संबंध हे पारंपरिक, सामाजिक व सांस्कृतिक संवादावर आधारलेले आहेत. त्याचे कुवेत हे एक उत्तम उदाहरण होय. तिसरे म्हणजे बदलत्या काळात भविष्यात या संबंधाला आणखी नव्या दिशेने पुढे घेऊन जाणे आवश्यक आहे. याबाबत त्यांनी केलेल्या भाषणामुळे भारतीय समुदायात नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. कुवेत-भारत दरम्यान व्यापार शतकानुशतकांपासून गतिमान आहे. कुवेतमधील मोती सुरत व मुंबईच्या बाजारात शेकडो वर्षांपासून विकले जातात. मुंबई तसेच गुजरातमध्ये पोरबंदर, वेरावळ, सुरत या बंदरांशी होणारा व्यापार हा द्विपक्षीय भागीदारीवर आधारलेला आहे. 100 वर्षांपूर्वी मुंबईमध्ये मोत्यांचे वजन कसे करावे ‘हाऊ टू कॅल्क्युलेट पर्ल वेट’ हा ग्रंथ कुवेतमधील एक व्यापारी अब्दुल लतीफ अल अब्दुल रज्जाक यांनी लिहिला होता. त्यावरून मोत्यांचा व्यापार भारताशी सुरत, वेरावळ, पोरबंदर इत्यादी बंदरातून किती प्रभावीपणे चालत असेल याची कल्पना येते. त्यांनी आपल्या ग्रंथाच्या प्रती पंतप्रधान मोदी यांना भेट दिल्या. मुंबई बाजारपेठेत कुवेती व्यापाऱ्यांनी चांगला विश्वास संपादन केला आहे.
भारताने संघटित केलेल्या खाडी राष्ट्र परिषदेत सहा देश आहेत. त्यापैकी कुवेत हा एक प्रमुख देश आहे. एकूण 10 लाख भारतीय या 6 खाडी देशांमध्ये राहतात. त्यापैकी 1 लाख निवासी भारतीय एकट्या कुवेतमध्ये राहतात.कुवेतमधील या 1 लाख भारतीयांचे प्रतिनिधित्व तेथे जमलेल्या 10,000 भारतीयांनी मोदी यांच्या उत्स्फूर्त स्वागताने केल्याचे दिसून येते.
मौलिक करार सूत्रे?
पंतप्रधानांच्या कुवेत भेटीनंतर परराष्ट्र मंत्रालयाने 27 कलमी निवेदन प्रकाशित केले आहे. त्यामध्ये इत्यंभूत माहिती देण्यात आली आहे. त्यातील प्रमुख उपलब्धींचा परामर्श घेतला असता असे दिसते की उभय देशातील संयुक्त भागीदारीचे यथार्थ प्रतिबिंब या निवेदनात उमटले आहे.
भारत आणि कुवेत यांच्यात संरक्षण क्षेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करार झाला आहे. त्यामुळे द्विपक्षीय संरक्षण सहकार्याला संस्थात्मक रूप प्राप्त होईल. सहकार्याच्या प्रमुख क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण, कर्मचारी आणि तज्ञांची देवाणघेवाण, संयुक्त सराव, सागरी किनाऱ्यांचे रक्षण आणि दहशतवाद व तस्करी विरोधी समान भूमिकांचा पुनरूच्चार करण्यात आला. तसेच संरक्षण भागीदारीमध्ये संरक्षण उत्पादन निर्मितीमध्ये सहकार्य, संरक्षण उपकरणांचा पुरवठा आणि संशोधन आणि विकासामध्ये सहकार्य यांचा समावेश आहे.
2025-2029 वर्षांसाठी भारत आणि कुवेत दरम्यान सांस्कृतिक आदानप्रदान कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार कला, संगीत, नृत्य, साहित्य आणि नाट्या या क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढविण्यात येईल. तसेच सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी पावले टाकण्यात येतील. सांस्कृतिक आदानप्रदान क्षेत्रात संशोधन, पर्यटन विकास, सांस्कृतिक उत्सवांचे आयोजन यावर भर देण्यात येणार आहे.
2025-2028 दरम्यान क्रीडा संवर्धन क्षेत्रात सहकार्यासाठी कृती कार्यक्रम आखण्यात आला आहे. त्यानुसार भारत आणि कुवेत यांच्यातील क्रीडा क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्याला बळकटी देण्यात येईल. त्यामुळे परस्पर समृद्ध अनुभवांची देवाणघेवाण, परस्पर प्रकल्प व विकास कार्यक्रमात सहभाग, क्रीडा वैद्यक, क्रीडा व्यवस्थापन, तज्ञांची देवाणघेवाण तसेच क्रीडा क्षेत्रात माध्यम शिक्षण आणि क्रीडा विज्ञान क्षेत्रातील प्रगत शास्त्राrय कल्पनांचा विकास करण्यावर भर देण्यात येणार आहे.
कुवेत सध्या भारताच्या नेतृत्वाखाली वैश्विक सौर ऊर्जा युतीचा सदस्य आहे. ही आघाडी संघटितपणे सौर ऊर्जा समस्यांना सामोरे जात आहे. त्यामुळे सदस्य देशांना कार्बन उत्सर्जनास मदत होत आहे. तसेच अडचणींवर मात करून सौर ऊर्जा निर्मिती प्रक्रियेस ही आघाडी गती देत आहे. त्यामुळे कुवेतला ऊर्जा बचतीचा मोठा फायदा होईल. दोन्ही देशांनी दहशतवाद विरोधात समान भूमिका घेतली असून त्यामुळे या वैश्विक संकटाशी सामना करणे शक्य होईल.
धोरणात्मक भागीदारी?
दोन्ही बाजूंनी सामायिक इतिहास आणि सांस्कृतिक स्नेहसंबंधांचे मूळ असलेले शतकानुशतकांचे जुने संबंध भक्कम करण्यावर भर देण्यात आला आहे. विविध स्तरावरील परस्पर संवादाच्या क्षेत्राचा विकास या बहुआयामी द्विपक्षीय सहकार्यामुळे शक्य झाला आहे. उभय देशात धोरणात्मक भागीदारीचे एक नवे पर्व सुरू केले आहे. त्यामुळे उभय देशातील आर्थिक संबंधांना एक नवी उच्चतर दिशा लाभली आहे. भारत-कुवेत दरम्यान संयुक्त व्यापार आयोग स्थापन करण्यात आला आहे. त्यामुळे आर्थिक क्षेत्रात पुनरावलोकनास नवे बळ लाभले आहे. भारत कुवेतमधील परस्पर व्यापाराची सांख्यिकी माहिती मोठी उद्बोधक आहे. भारत-कुवेत दरम्यान 2023-2024 पर्यंतचा व्यापार 10.47 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढणार आहे. ही वाढ गतवर्षीच्या तुलनेने 30 पटीने अधिक आहे. 2022-23 मध्ये भारतीय निर्यात 1.56 अब्ज डॉलर्स एवढी होती. 2023-24 मध्ये ती दुप्पट होऊन 2.1 बिलीयन डॉलर्सपर्यंत पोहोचली. दरवर्षी 34.7 टक्के एवढी व्यापारात वाढ होत आहे. अशा या महत्त्वपूर्ण व्यापारी संबंध असलेल्या देशाशी भावी संबंध दृढ होणे अधिक फायद्याचे आहे. ऊर्जा, संरक्षण आणि तंत्रज्ञान या क्षेत्रातील भागीदारीसाठी झालेले सामजंस्य करार अत्यंत महत्त्वाचे आहेत. आर्थिक संबंधाच्यादृष्टीने विचार करता कुवेत हा भारताचा सर्वात मोठा भागीदार आहे. कच्च्या तेलाच्या पुरवठादारामध्ये तो सहावा मोठा सहयोगी आहे. भारताच्या एकूण गरजांपैकी 3 टक्के ऊर्जा गरजा कुवेतकडून पूर्ण होतात. त्यामुळे पंतप्रधानांच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे. या दौऱ्यामुळे पर्यटन, आरोग्य, सेवा, अन्न सुरक्षा, दळणवळण, जीवनावश्यक वस्तूंची रसद, फळे व भाजीपाला अशा विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक वाढत आहे. कुवेतमधील गुंतवणुकीत भारतीय उद्योग व कंपन्या पुढे सरसावल्या आहेत. त्यामुळे कुवेतमध्ये पायाभूत सुविधांचा विकास होईल आणि भारतीय तरूणांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. तेथे औषधी कंपन्यांचे उद्योग स्थापन करण्याच्या संधी शोधल्या जात आहेत.
.प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर








