एक स्कॉटिश व्यक्ती स्वत:च्या मुलांसाठी घराच्या मागील बाजूला स्वीमिंग पूल निर्माण करण्याच्या उद्देशाने खोदकाम करत होता. या खोदकामादरम्यान 44 वर्षीय पॉल मॅकडोनाल्ड यांना जे मिळाले, ते पाहून पॉल थक्क झाले. पॉल यांना तेथे 8 हजार वर्षे जुन्या डॉल्फिनची हाडं मिळाली आहेत. तेथे आणखी काही दफन असण्याची अपेक्षा त्यांना नव्हती, परंतु या हाडांच्या शोधानंतर संबंधित भागात 8 हजार वर्षांपूर्वी पाणीच पाणी राहिले असावे, असा निष्कर्ष व्यक्त करण्यात आला आहे.

पॉल मॅकडोनाल्ड हे 4 मुलांचे वडिल आहेत. मी स्वीमिंग पूलसाठी खोदकाम करत असताना मला काही असामान्य गोष्ट दिसून आली. मी ती बाहेर काढल्यावर ते एखाद्या प्राण्याचे आवशेष असल्याचे लक्षात आल्याचे पॉल यांनी सांगितले आहे.
डॉल्फिन यांच्या हाडांना सुमारे 31 इंच खोल मातीत संरक्षित करण्यात आले होते. 8 हजार वर्षांपर्यंत ते मातीत दाबून राहिले असावेत. 10 फूट लांब सांगाड्यासोबत हरणांच्या शिंगांद्वारे तयार एक तुटलेले उपकरण तेथे आढळून आले. या उपकरणाचा वापर डॉल्फिनचे मांस कापण्यासाठी करण्यात आला असावा, असे पुरातत्व तज्ञांनी सांगितले आहे. प्राचीन स्थानिक लोकांनी भोजनाच्या स्वरुपात डॉल्फिनला फस्त केले असावे असे तज्ञांचे मानणे आहे. आम्ही 6 वर्षांपूर्वी हे घर खरेदी केले होते. या परिसरात मला आणखी काही रंजक गोष्टी सापडल्या आहेत, असे पॉल यांनी सांगितले आहे.









