एकाच रस्त्याच्या दोन्ही बाजूला वसलेले गाव
जगातील अनेक सुंदर गावांची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. गावांमधील जीवन खास असते, तेथे राहणारे लोक परस्परांना ओळखत असतात. काही गावे ही पर्वतीय भागात तर काही मैदानी भागात असतात. जगातील एक असे गाव आहे, जेथे सर्व लोक परस्परांच्या अत्यंत नजीक राहतात. या सर्व लोकांची घरं एकाच रस्त्याच्या कडेला बांधली गेली आहेत. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला वसलेले हे गाव सुंदर शेतांनी वेढले गेलेले आहे.

पोलंडच्या क्राकोव्ह शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर सुलोसवा गाव आहे. या गावात सुमारे 6 हजार लोकांचे वास्तव्य आहे. गावाचे वैशिष्टय़ म्हणजे येथे राहणारे लोक केवळ एकाच रस्त्याच्या आजूबाजूला राहतात. शेतांमधून एक 9 किलोमीटर लांबीचा रस्ता असून त्याच्या दोन्ही बाजूला लोकांची घरे बांधलेली आहेत. 2021 मध्ये पहिल्यांदा पोलंडच्या या गावाची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. गावात केवळ एकच प्रमुख रस्ता असणारे युरोपमधील हे एकमेव गाव आहे. या गावातील सर्व लोक रस्त्याच्या आजूबाजूला राहतात. त्यांनी अन्य कुठेच घर बांधलेले नाही.









