उंब्रज :
पुणे-बेंगळूरू आशियाई महामार्गावर वराडे (ता. कराड) गावच्या हद्दीत ट्रॅव्हलची धडक बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना गुरूवारी 7 रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. उंब्रज व तळबीड पोलीस ठाण्याच्या हद्दीवर हा अपघात घडला असून जखमी मिरज तालुक्यातील रहिवासी आहे. त्यास उपचारासाठी कराड येथे हलवण्यात आले आहे. घटनास्थळी स्थानिकांची मोठी गर्दी झाली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, महामार्गावर वराडे गावच्या हद्दीत गेल्या एक वर्षांपासून रस्ता रुंदीकरणाचे काम अर्धवट करण्यात आले आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर अपघातांचे सत्र सुरू आहे. गुरूवारी 7 रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास वराडे हद्दीत सातारा ते कराड जाणाऱ्या लेनवर पेट्रोल पंपासमोर ट्रॅव्हलचा हिरो कंपनीच्या दुचाकीला धक्का लागला. या धक्क्याने दुचाकीस्वार रस्त्यावर आपटल्याने गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर उंब्रज व तळबीड पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जखमीस उपचारासाठी रुग्णवाहिकेने कराड येथे हलवण्यात आले आहे. सदर व्यक्ती ही आरग (ता. मिरज) येथील रहिवासी आहे, परंतु जखमीचे नाव समजू शकले नाही. घटनास्थळी रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून पंचनामा सुरू होता.








