एका गटाने दबाव आणल्याचा तक्रारदाराचा गौप्यस्फोट : एसआयटीकडून कसून
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यासह देशभरात खळबळ उडवून दिलेल्या धर्मस्थळमधील शेकडो मृतदेह पुरल्याच्या प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळाले आहे. तक्रारदाराने दाखविलेल्या अनेक ठिकाणी सुरू केलेले उत्खनन एसआयटीने स्थगित केले असून मागील दोन दिवसांपासून तक्रारदार व्यक्तीची कसून चौकशी चालविली आहे. त्याने आपल्यावर एका गटाने दबाव आणला होता, असा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे तपासाला कलाटणी मिळाली आहे.
2014 नंतर मी तामिळनाडूमध्ये होतो. 2023 मध्ये एका गटाने माझ्याशी संपर्क साधला. त्यांनी मला धर्मस्थळमध्ये मृतदेह दफन केल्याबद्दल विचारणा केली. मी त्यांना कायद्यानुसार मृतदेह दफन केल्याचे सांगितले. मात्र, त्या गटाने मला चुकीची माहिती देण्यासाठी दबाव आणला होता, अशी धक्कादायक माहिती तक्रारदार व साक्षीदाराने एसआयटीसमोर उघड केली आहे. तक्रारदार व्यक्तीच्या वक्तव्यामुळे मंगळूर जिल्ह्याच्या धर्मस्थळ येथील मृतदेह दफन प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे.
डिसेंबर 2023 मध्ये मला एका गटाने तामिळनाडून मंगळूरला आणले. न्यायालयापुढे जबाब देण्यास मी घाबरत होतो. महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर पोलीस अणि न्यायालयासमोर जबाब देण्याचे धाडस आले. त्यामुळेच मी पुढे आल्याचे त्या व्यक्तीने म्हटल्याचे समजते.
त्या गटाने कवटी आणून मला सांगितल्याप्रमाणे करावयास भाग पाडले. पोलिसांसमोर काय बोलावे, काय सांगावे, हे मला तिघेजण नियमितपणे सांगत होते. त्याप्रमाणेच मी पोलिसांसमोर हजर होऊन माहिती दिल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. तक्रारदाराचे जबाब व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले असून अधिक चौकशी केली जात आहे.
एसआयटीकडून उत्खनन स्थगित : डॉ. परमेश्वर
धर्मस्थळमध्ये शेकडो मृतदेह पुरल्याची अज्ञात व्यक्तीने तक्रार दिल्यानंतर सरकारने एसआयटीकडे हे प्रकरण सोपविले आहे. त्या व्यक्तीने दाखविलेल्या सर्व ठिकाणी उत्खनन करण्यात आले आहे. मात्र, कोठेही पूर्ण प्रमाणात मानवी सांगाडे सापडलेले नाहीत. त्यामुळे एसआयटीने सध्या येथील उत्खनन स्थगित केले आहे. गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी विधानसभेत ही माहिती दिली आहे.
सोमवारी विधानसभेत विरोधी पक्षांनी धर्मस्थळमधील एसआयटी तपासाविषयी माहिती देण्याची मागणी केली. त्यावर उत्तर देताना गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर म्हणाले, 25 वर्षांपासून अनेक महिला बेपत्ता झाल्यासंबंधीचे पत्र महिला आयोगाच्या अध्यक्षांनी पाठविले आहे. त्यानुसार 19 जुलै रोजी एसआयटी स्थापन करण्यात आली. आयपीएस अधिकारी डॉ. प्रणब मोहंती यांच्या नृत्वाखाली एसआयटीने तक्रारदार व्यक्तीचे 161 जबानी नोंदविले आहेत. अज्ञात व्यक्तीने मृतदेह कोठेकोठे पुरले, याची माहिती दिली आहे. त्यानुसार एसआयटीने अनेक ठिकाणी खोदकाम केले आहे. केवळ दोनच ठिकाणी मानवी सांगाड्याचे काही अवशेष सापडले आहेत. ते फॉरेन्सिक लॅबला पाठविले आहेत. अद्याप तपास सुरू झालेला नाही. अहवाल आल्यानंतर अधिकृतपणे तपासाला प्रारंभ होईल. मात्र, अज्ञात व्यक्तीने धर्मस्थळमध्ये दाखविलेल्या सर्वच ठिकाणी उत्खनन करणे शक्य नाही. उत्खनन स्थगित करणे हा एसआयटीचाच निर्णय आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
उत्खननावेळी सापडलेले सांगाड्यांचे अवशेष, तेथील मातीचा तपासणी अहवाल येणे बाकी आहे. विश्लेषण अहवाल आल्यानंतरच तपासाला प्रारंभ होईल. पुढील तपास गंभीरपणे आणि पारदर्शकपणे होईल. कोणाच्याही दबावाला बळी न पडता एसआयटीकडून हे काम सुरू आहे, असेही डॉ. परमेश्वर यांनी सांगितले.
भाजप शिष्टमंडळाने घेतली धर्माधिकारी वीरेंद्र हेग्गडे यांची भेट
धर्मस्थळमधील मृतदेह दफन प्रकरणाला धार्मिक वाद निर्माण होत असतानाच भाजप नेत्यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांच्या नेतृत्त्वाखाली धर्मस्थळचे धर्माधिकारी वीरेंद्र हेग्गडे यांची भेट घेऊन पाठिंबा व्यक्त केला आहे. वीरेंद्र हेग्गडे यांची भेट घेण्यापूर्वी भाजप नेत्यांनी मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले.









