सोने-चांदी, वाहने, फ्लॅट-प्लॉट, इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर भर
बेळगाव : दसऱ्यानिमित्त सराफी पेढ्यांवरती लक्षणीय गर्दी होती. सोने महागले म्हणजेच तोळ्याला 63,300 इतका दर असला तरी खरेदीचा उत्साह कायम होता. विशेष म्हणजे वैष्णव ब्राह्मण समाजाने सोमवारी दसरा साजरा केला. त्यामुळे या समाजाने विविध सराफी पेढ्यांवर सोमवारी गर्दी केली. मंगळवारी इतर समाजाच्या ग्राहकांनी गर्दी केली. तीन दिवस सलग आलेल्या सुटीमुळे ग्राहकांना खरेदी करणेसुद्धा सुकर झाले आणि तिन्ही दिवस गर्दीचा ओघ कायम राहिला. दसऱ्याच्या निमित्ताने घर किंवा फ्लॅट खरेदी करणे, भूमीपूजन करणे किंवा फ्लॅटसाठी नाव नोंदविणे असे मुहूर्त साधले जातात. यंदा अनेकांनी फ्लॅट आणि घरांच्या दरांची चौकशी केली. लवकरच दिवाळी असल्याने दसऱ्यादिवशी निश्चित करून दिवाळीला खरेदी करण्याचा मनोदय ग्राहकांचा असल्याचे बांधकाम व्यावसायिकांनी सांगितले. इलेक्ट्रॉनिक बाजारपेठेत गर्दी होतीच, परंतु ज्येष्ठमंडळी किंवा नोकरदार फॅन, एसी, वॉशिंग मशीन, टीव्ही अशा उपकरणांच्या खरेदीमध्ये व्यग्र असताना तरुणाईने मात्र मोबाईल शोरूम्स गाठल्याचे दिसून आले. मोबाईल सोबतच वाहन खरेदीसाठी उत्साह दिसून आला. दुचाकी, चारचाकी, मोपेड वाहन खरेदीसाठी प्रि-बुकिंग करण्यात आले होते. वाहन नेण्यासाठी शोरूम्ससमोर गर्दी झाली होती. तसेच नव्या वाहनांची पूजा करण्यासाठी चन्नम्मा येथील गणेश मंदिर व हिंडलगा गणपती मंदिरासमोर दुचाकी, चारचाकी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. साहित्याच्या खरेदीसोबतच वस्त्रप्रावरणे खरेदीसाठी बाजारपेठ परिसरात गर्दी होती. शहरातील शोरूम्स तसेच लहान दुकानदारांकडे खरेदीसाठी तुफान गर्दी होती. यामुळे बेळगावच्या एकूण बाजारपेठेत दसऱ्याच्या खरेदीमुळे कोट्यावधी रुपयांची उलाढाल झाल्याचे चित्र दिसून आले.