संमेलनाचे अध्यक्ष साहित्यिक कृष्णात खोत यांचे विचार
बेळगाव : यांत्रिक जगण्याच्या निरसतेवर कल्पकताच मात करू शकते. अन्यथा, जगण्यातून अनेक गोष्टी वजा होत जातात आणि समाजाचे झुंडीत रुपांतर होते. ही झुंडशाही समाजातील सभ्यतेलाच नख लावून गोंगाटामध्येही माणूस एकटा पडतो. या एकट्या पडणाऱ्या माणसाचा, बहिऱ्या शांततेचा आवाज जो साहित्यिक ओळखतो, तोच खरा साहित्यिक होय. क्षुल्लकातील क्षुल्लकाचा आवाज साहित्यिकाला पकडता यायला हवा, असे विचार साहित्य अकादमी पुरस्कार विजेते साहित्यिक कृष्णात खोत यांनी व्यक्त केले. अ. भा. मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर बेळगाव आयोजित पाचवे अ. भा. बेळगाव मराठी साहित्य संमेलन रविवारी मराठा मंदिरच्या छत्रपती शिवाजी महाराज संमेलननगरीमध्ये उत्साहात पार पडले. यावेळी संमेलनाध्यक्ष या नात्याने कृष्णात खोत बोलत होते. ते म्हणाले, जगणे जेव्हा साहित्यामध्ये उमटते, तेव्हा ते साहित्य वैश्विक होते. माणसाच्या जगण्याचे साहित्य माझ्या भाषेत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य माझ्या देशाने मला दिले आहे. मी कोणत्याही प्रांतात असलो तरी माझी भाषा मला श्रेष्ठ आहे. भाषाभगिनींचा गौरव करताना आपल्या मूल्य संस्कृतीची, भाषेची गळचेपी करणे ही हुकूमशाही कोणताही भाषिक व लेखक खपवून घेत नाही. लेखक लोकशाहीची, गांधीवादाची, शिवरायांची भाषा बोलतो. छत्रपती शिवरायांनी सर्व हुकूमशाहींच्या विरोधातच काम केले. मात्र, आज लाज, अब्रू आणि भाषा या तीन शब्दांचा आम्हाला विसर पडला आहे. या व्यासपीठावर तयार झालेली माणसे आज कुठे गेली आहेत? काल माझा असणारा नेता आज कुठे आहे? याचा विचार तुम्ही करायला हवा, असे आवाहनही त्यांनी केले.
अन्न, वस्त्र, निवारा तसेच राजकारण चौथी गरज
विविधततेत एकता हे माझ्या देशाचे वैभव आहे, सौंदर्य आहे. ही विविधता नष्ट झाल्यास सौंदर्याची संकल्पना नष्ट होऊन त्यातील चैतन्य जाईल. आज अन्न, वस्त्र, निवारा याबरोबरच राजकारण ही चौथी गरज झाली आहे आणि सर्वत्र समाजाचे झुंडीमध्ये रुपांतर होण्याची भीती बळावत आहे. आजच्या भवतालात ही झुंड एका व्यक्तीचीसुद्धा असू शकते, जी समाजाच्या सभ्यतेलाच नख लावणार आहे. लेखक म्हणून मला या सभ्यतेची काळजी वाटायला हवी. जे जे वैगुण्य दिसते आहे, त्यावर प्रतिक्रिया देण्याची हिंमत माझ्यात असायला हवी. लेखकाने सत्तेच्या नाही तर सत्याच्या बाजूने उभे राहणे हे त्याचे कर्तव्यच आहे, असेही खोत म्हणाले. आजच्या समाजाचे बारकाईने निरीक्षण केल्यास प्रचंड अशा प्रेमाचे आलिंगन देण्याची प्रथा बळावत आहे. त्यामुळे हळूहळू समाजाचा स्मृतीभ्रंश करण्याचा कावा लेखकाने ओळखून समाजाला जागे करायला हवे. लेखकाने मिरवायचे नाही तर जिरवायचे असते. सामान्यातील सामान्य माणसाला कस्पटासमान लेखण्याचा जो प्रयत्न होतो आहे, त्या विरोधात लेखकाने उभे राहायला हवे. सामान्याचा क्षीण आवाज गर्दीतही त्याला ऐकू यायला हवा. निरीक्षण नोंदविणे हे त्याचे काम आहे आणि समाजाला शांत डोळ्याने विश्वासार्हता देणे ही त्याची जबाबदारी आहे, असेही कृष्णात खोत यांनी नमूद केले. परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर साहित्याचाच विचार व्हावा, स्तुतीपाठकांमुळे समाजाचे नुकसान होते, हे लक्षात घ्या. शिवरायांचा धर्म संकुचित नव्हता तर तो विश्वव्यापक होता. त्यामुळे शिवरायांच्या नावावर सुरू असलेल्या राजकीय दुकानदारीपासून दूर रहा आणि इतिहास घडवता येत नसेल तर तो जतन करा, असे आवाहन त्यांनी केले. उद्घाटक आप्पासाहेब गुरव यांनी वेळेची मर्यादा लक्षात घेऊन भाषेसाठी आपण सर्वजण एकत्र काम करूया, अशी ग्वाही दिली.
उपयोगी गलबत
जगातील सर्वात कठीण परिस्थितीमध्येसुद्धा जे गलबत उपयोगी ठरेल, ते गलबत आहे पुस्तकांचे. पुस्तकांचे शस्त्र हातात घ्या, साहित्याची, वाचनाची, संस्कृतीची परंपरा अखंड पुढे न्यायची असल्यास लोकांना कार्यक्रम द्यायला हवेत. त्यामुळे केवळ संमेलनाने थांबू नका, वर्षभर वेगवेगळे उपक्रम करा, त्यातूनच नवा लेखक घडू शकेल, असा आशावादही कृष्णात खोत यांनी व्यक्त केला.









