टिळकवाडी तिसरे रेल्वेगेट येथील प्रकार : मोठा फलक लावण्याची गरज
बेळगाव : टिळकवाडी येथील तिसरे रेल्वेगेटनजीक उभारण्यात आलेल्या लोखंडी कमानीमध्ये अवजड वाहतूक करणारी ट्रक अडकल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली. चालकाला लोखंडी कमानीचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला. यामध्ये ट्रकचे नुकसान तर झालेच त्याचबरोबर लोखंडी कमानही काँक्रिटमधून बाहेर निखळली आहे. लोखंडी कमान लावलेल्या पाचव्या दिवशीच हा अपघात घडला. टिळकवाडी येथील तिसरे रेल्वे ओव्हर ब्रिजखालून अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. यासाठी काँग्रेस रोडच्या दोन्ही बाजूला लोखंडी कमान उभारण्यात आली आहे. 13 फूटांपेक्षा अधिक उंच असणाऱ्या वाहनांना तिसरे रेल्वेगेटवरील ओव्हर ब्रिज खालून वाहतूक करण्यास मनाई करण्यात आली आहे. रविवार दि. 27 रोजी सायंकाळच्या सुमारास लोखंडी कमान बसविण्यात आली. रेल्वे ओव्हरब्रिज खालून जास्त उंचीची वाहने गेल्यास रेल्वे ओव्हर ब्रिजलाही धोका पोहोचण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेण्यात आला होता. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास गोगटे सर्कलमधून उद्यमबागला जाणारा एक अवजड ट्रक काँग्रेस रोडवर लावण्यात आलेल्या कमानीमध्ये अडकला. भरधाव वेगाने आलेल्या या ट्रकमुळे लोखंडी कमान एका बाजूला उचलली गेली. यामध्ये ट्रकच्या टपाचेही नुकसान झाले आहे. लोखंडी कमान नटबोल्डसकट काँक्रिटमधून निखळून बाहेर आली. त्यामुळे बऱ्याच प्रयत्नानंतर कमानीमध्ये अडकलेला ट्रक बाहेर काढण्यात आला.
प्रशासनाच्या चुकीमुळे होताहेत अपघात
काँग्रेस रोडवरून 13 फुटांपेक्षा अधिक उंचीच्या वाहनांना वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे ही वाहने बसवेश्वर उ•ाण पुलावरून वळविण्यात येत आहेत. वास्तविक, गोगटे सर्कल येथे मोठा फलक लावून त्यावर अवजड वाहनांना बंदी असल्याचे ठळकपणे देणे गरजेचे आहे. दिवसा रहदारी पोलीस अवजड वाहनांना बसवेश्वर उ•ाण पुलावरून वाहने मार्गस्थ करतात. परंतु रात्रीच्यावेळी अंधारात लावण्यात आलेला छोटा फलक दृष्टीस न पडल्याने असे अपघात होत आहेत.









