कित्तूरजवळील घटना, दुर्घटना टळली
प्रतिनिधी/ बेळगाव
पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कित्तूरजवळ शनिवारी सायंकाळी ट्रकला आग लागली. या आगीत सुदैवाने जीवित हानी झाली नाही. मात्र ट्रक जळून खाक झाला असून ट्रकमधील शहाळेही जळाले आहेत. पेट्रोलपंपपासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडली असून सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.
शनिवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास धारवाडहून बेळगावकडे येणाऱ्या मार्गावरील शिवा पेट्रोलपंपजवळ ही घटना घडली आहे. टीएन 88 वाय 7369 क्रमांकाचा ट्रक उभा होता. त्या ट्रकला अचानक आग लागली, असे सांगण्यात आले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

ट्रकमध्ये शहाळे भरण्यात आले होते. हा ट्रक चेन्नईहून मुंबईला निघाला होता. रस्त्याशेजारी ट्रक उभा करून चालक व वाहक स्वयंपाक करत होते. यावेळी स्टोव्हचा फडका उडून ही घटना घडल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. आगीचा प्रकार उघडकीस येताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.
घटनेची माहिती समजताच कित्तूरचे पोलीस निरीक्षक महांतेश होसकोटी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पेट्रोलपंपपासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडली आहे. मात्र मोठी दुर्घटना टळल्याचे जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी सांगितले.
वैभवनगरजवळही घटना
दरम्यान शनिवारी रात्री वैभवनगरजवळ ट्रकला आग लागली आहे. या आगीत ट्रकचे नुकसान झाले असून सुदैवाने जीवित हानी झाली नाही. फर्निचर घेऊन गुजरातहून म्हैसूरला जाणाऱ्या ट्रकला आग लागली असून चालकाने प्रसंगावधान राखून ट्रकमधील फर्निचर काढून टाकले. अग्निशमन दलाचे अधिकारी व्ही. एस. टक्केकर व त्यांचे सहकारी बंबासह घटनास्थळी दाखल झाले. प्रयत्न करून त्यांनी आग आटोक्यात आणली. शॉर्टसर्किटने ही घटना घडली असावी, असा संशय आहे.









