अवघ्या पाच दिवसांत कमानीचे नुकसान
बेळगाव : अवजड वाहतूक रोखली जावी यासाठी मिलिटरी महादेव मंदिराच्या प्रवेशद्वारानजीक उभारण्यात आलेली कमान अवघ्या पाच दिवसांत मोडण्यात आली. रविवारी एका ट्रकची धडक बसल्याने ही कमान मोडली गेली. वाहन चालकाला कमानीचा अंदाज न आल्याने कमानीचे नुकसान झाले आहे. कॅम्प भागातून अवजड वाहतूक बंद करावी यासाठी ठिकठिकाणी लोखंडी कमानी बसविण्यात आल्या. हिंडलगा येथील गांधी स्मारक, ग्लोब थिएटर तसेच मिलिटरी महादेव मंदिरानजीक लोखंडी कमान बसविण्यात आली. मंगळवार दि. 2 रोजी लष्कराच्या जवानांनी लोखंडी कमान बसवली होती. यापूर्वीही याच ठिकाणी लोखंडी कमान होती. ट्रकने धडक दिल्याने ती देखील कोसळली होती. लोखंडी कमान बसविलेल्या अवघ्या पाच दिवसातच ती पुन्हा मोडली आहे. रविवारी सायंकाळी एका मालवाहू ट्रकने धडक दिल्याने कमानीचे नुकसान झाले. यामुळे काही काळ मिलिटरी महादेव मंदिर परिसरात वाहतूक कोंडी झाली होती.









