बेळगाव-वेंगुर्ले मार्गावर हिंडलगा गणेश मंदिरनजीक अपघात : दोन दुचाकीस्वार जखमी
वार्ताहर /उचगाव
बेळगाव-वेंगुर्ले या मार्गावरील हिंडलगा गणेश मंदिराशेजारी ऊस वाहतूक करणारा ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातात मोटारसायकल वरून जाणारे दोन युवक उसाखाली सापडून गंभीर जखमी झाले आहेत. सदर घटना गुरुवारी दुपारी दीडच्या सुमाराला घडली. या अपघातामुळे मार्गावरील वाहतूक सव्वा तास बंद ठेवून कॅम्प राकसकोप रोड मार्गे वळविण्यात आली होती. उसाने भरलेला एम.एच.09 सी.यू. 9288 ट्रक चंदगड तालुक्यातील साखर कारखान्याकडे जात असताना हिंडलगा गणेश मंदिराच्या वळणावर असलेले गतिरोधक पार करताना या वळणावर वळण अधिक असल्याने ट्रक पलटी झाला. नेमके याच वेळी बेळगावच्या दिशेने मोटारसायकलवरून जाणारे दोन युवक उसाखाली सापडले. मात्र नशीब बलवत्तर म्हणून ते दोघेही बचावले. तातडीने त्यांना रुग्णवाहिकेतून सिव्हिल हॉस्पिटलला उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातानंतर ट्राफिक पोलीस, मिलिटरी पोलीस व इतर अधिकाऱ्यांनी तातडीने येऊन जेसीबीच्या साहाय्याने पलटी झालेला ट्रक बाजूला सरकविण्यात आला व रस्त्यावर पसरलेला वीस ते पंचवीस टन ऊस रस्त्याच्या दुतर्फा ठेवण्यात आला. पलटी झालेला ट्रक तसेच रस्त्यावर पसरलेला ऊस बाजूला सारून सव्वा तासानंतर हा मार्ग मोकळा करण्यात आला.
संरक्षण भिंतीलाही गेले तडे
उसाने भरलेला ट्रक पलटी झाल्याने या उसाच्या जोरदार धक्क्याने गणेश मंदिराच्या शेजारी बांधलेल्या संरक्षण भिंतीला आदळल्याने या भिंतीलाही तडे गेले आहेत. सध्या वेगवेगळ्या साखर कारखान्यांकडे ऊस वाहतूक सुरू आहे. मात्र ऊस भरत असताना योग्य ती खबरदारी ट्रॅक्टर, ट्रकमालक घेत नसल्याने अशा प्रकारच्या घटना घडत असतात. या ठिकाणीच एक वर्षापूर्वी वळणावर असाच ट्रक पलटी होऊन अपघात घडला होता. त्यामुळे सदर वळणावर सार्वजनिक बांधकाम खात्याने दक्षता घेऊन अपघात घडणार नाहीत याची दक्षता घ्यावी, अशी नागरिकांची मागणी होत आहे.









