भारतात अनेक जमातींचे वास्तव्य पुरातन काळापासून आहे. अनेक जमातींच्या रितीपद्धती अनोख्या आहेत. काही जमाती तर त्यांच्या जगावेगळय़ा चालीरितींमुळे साऱया जगात प्रसिद्ध आहेत. कर्नाटकात भद्रपूर येथे वास्तव्यास असणारी ‘हक्की पिक्की’ नावाची जमात आहे. या जमातीत जन्माला येणाऱया मुलामुलींची नावे अशा प्रकारची असतात की त्यामुळे ही जमात साऱया जगात प्रसिद्ध झालेली आहे.
ही जमात हजारो वर्षांची असली तरी मुलांची नावे मात्र आधुनिक समाजालाही मागे टाकणारी आहेत. सुप्रिम कोर्ट, गुगल, कॉफी, म्हैसूरपाक, अमेरिका, ओबामा, डॉलर अशी नावे मुलांना ठेवली जातात. प्रतिदिन गुगलचा उपयोग करणारे एखादे शहरी आधुनिक कुटुंबही आपल्या मुलाचे नाव गुगल ठेवणार नाही. पण या जमातीत हे नाव सर्रास आढळते. या जमातीचे लोक भटके आहेत. ते गावोगावी जाऊन छोटा मोठा व्यापार करतात. तेथे त्यांना जी नावे कानावर पडतात ती ते आपल्या मुलांना देतात. आपल्याला आवडणाऱया वस्तूंची किंवा खाद्यपदार्थांची नावे ते आपल्या मुलांना देतात. अनेकजण कुतुहलापोटी या जमातीला भेट देतात.









