प्रादेशिक साखर सहसंचालकांचे आदेश : आमदार प्रकाश आबिटकर यांची माहिती
कोल्हापूर प्रतिनिधी
चार तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याचे चाचणी लेखापरीक्षण करण्याचे आदेश कोल्हापूरचे प्रादेशिक सहसंचालक (साखर) अशोक गाडे यांनी मंगळवारी (दि. 31 ऑक्टोबर) दिले आहेत. लेखा परीक्षण करण्याकरिता विशेष लेखापरीक्षक वर्ग- 1 डी.बी.पाटील यांची नेमणूक करण्यात आली असून त्वरीत लेखापरीक्षण पूर्ण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. ही माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की,बिद्री साखर कारखानाच्या मागील पाच वर्षातील कामकाजाचे चाचणी लेखापरीक्षण करण्याची मागणी कारखान्याचे माजी संचालक दत्तात्रय उगले, अशोक फराकटे, बाबा नांदेकर व विजय बलुगडे आदींनी तत्कालीन सहकार मंत्री अतुल सावे यांच्याकडे केली होती. त्यानुसार साखर आयुक्तांना लेखापरीक्षणाचे आदेश देण्यात आले होते. या कारखान्यामध्ये केलेल्या चुकीच्या कामकाजाबाबत एकूण 17 मुद्दे उपस्थित केले होते. या अनुषंगाने करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशी अहवालामध्ये गंभीर स्वरूपाच्या बाबी उपस्थित झाल्या होत्या. त्यानुसार कारखान्यांमध्ये सुरू असलेल्या चुकीच्या कामकाजाचे लेखापरीक्षण करण्याबाबतचा प्रस्ताव विभागीय साखर सहसंचालक यांनी आयुक्त साखर यांच्याकडे सादर केला होता. या प्राथमिक चौकशी अहवालास स्थगिती देण्याची मागणी सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे चेअरमन के.पी.पाटील यांनी केली होती. त्यानुसार लेखापरीक्षणास तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती. या देण्यात आलेल्या स्थगिती विरोधात दाद मागण्यासाठी बिद्री कारखाना बचाव कृति समिती शासन स्तरावर प्रयत्न करत होती. या प्रयत्नांना यश आले आहे. या चाचणी लेखापरीक्षणाची मागणी करणाऱ्यात मारुतीराव जाधव, गोकुळ संचालक नंदकुमार ढेंगे, सूर्याजीराव देसाई, बाळासाहेब भोपळे आदींचाही समावेश होता.









