ही पृथ्वी आश्चर्यकारक विविधतेने भरलेली आहे. असंख्य प्रकारच्या वनस्पती आणि प्राणी या पृथ्वीवर आहेत. त्यांपैकी कित्येकांची माहितीही मानवाला अद्याप व्हायची आहे. मानवानेही आपल्या बुद्धीचा उपयोग करुन अनेकविध प्रयोग केले आणि अनेक प्रकारची निर्मिती केली आहे. आधुनिक विज्ञान भारतात ब्रिटीशांनी आणले असे म्हटले जाते. त्यामुळे भारताला एक नवी दिशा मिळाली. भारतीय वनस्पतींवर ब्रिटीश संशोधकांनी केलेल्या प्रयोगांमधून एका विस्मयकारक झाडाची निर्मिती झाली आहे. हे झाड हिमाचल प्रदेशच्या राष्ट्रपती निवासाच्या परिसरात आहे. हे झाडांच्या पानांचे रंग सूर्यप्रकाशाच्या तीव्रतेनुसार पालटतात.
भारतात अशा प्रकारची केवळ पाच झाडे हिमाचल प्रदेशात असल्याचे संशोधकांचे मत आहे. या झाडाच्या खाली उभे राहून त्याच्या पानांकडे पाहिले असता ती हिरव्या रंगाची असल्याचे दिसते. तथापि, थोड्या अंतरावरुन पाने पाहिली असता ती काळ्या रंगाची दिसतात. सूर्याच्या किरणांची तीव्रता जशी वाढत जाते, तसा पानांचा रंगही पालटत जातो. या झाडाचे नाव ‘कॉपर बीच’ असे ठेवण्यात आले आहे. हिमाचल प्रदेशच्या राष्ट्रपती निवासाच्या परिसरात अशी तीन झाडे असून एक झाड हिमाचल प्रदेशच्याच वाईल्ड फ्लॉवर हॉल आणि एक झाड चायल पॅलेसच्या परिसरात आहे, अशी माहिती दिली जाते.
ही झाडांची लागवड येथे ब्रिटीशांचे एक सैनिक अधिकारी लॉर्ड किचनर यांनी केली, अशी माहिती इतिहासातील नोंदींमध्ये सापडते. लॉर्ड किचनर यांना बागकाम आणि वृक्षांवर तसेच वनस्पतींवर प्रयोग करण्याचा मोठा छंद होता. भारतात अशी झाडे केवळ पाच असली तरी, ब्रिटनमध्ये ती मोठ्या संख्येने आहेत. या झाडांसंबंधीचे सुरवातीचे प्रयोग ब्रिटनमध्येच करण्यात आले होते. नंतर ते भारतात करण्यात आले. त्यामुळे ही झाडे हा निसर्गाचा चमत्कार नसून विज्ञानाची निर्मिती आहे, असेही वनस्पती संशोधकांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.









