सुदैवाने जीवितहानी टळली, वाहनधारकांत मात्र भीतीचे वातावरण
वार्ताहर /नंदगड
खानापूर तालुक्यातील प्रमुख रस्त्यावर पावसाळ्यात झाडे पडण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. एका महिन्यात तिसऱ्यांदा रस्त्यावर झाड पडण्याचा प्रकार मंगळवारी घडला. खानापूर-यल्लापूर राज्य मार्गावरील हेब्बाळ गावच्या हद्दीत रस्त्याच्या बाजूला असलेले झाड मुळासहित उन्मळून रस्त्यावर पडले. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. झाड रस्त्यावर पडले असले तरी वाहतुकीवर मात्र कोणताही परिणाम झाला नाही. परंतु रस्त्याच्या बाजूला असलेली जीर्ण झाडे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांच्या अंगावर कधी पडतील याचा नेम नाही. या घटनेमुळे मात्र वाहनधारकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
खानापूर-यल्लापूर राज्य मार्गावरील हेब्बाळ गावाजवळ रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठमोठी झाडे आहेत. शिवाय खानापूरपासून लिंगनमठ गावापर्यंत रस्त्याच्या बाजूला अनेक झाडे पहावयास मिळतात. ही झाडे कित्येक वर्षापासून आहेत. या झाडामुळे रस्त्यावरून जाणाऱ्यांना सावली व फळे चाखायला मिळत असली तरी सध्या ही झाडे जुनी व जीर्ण झाली आहेत. कमकुवत झाडे तोडणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. परंतु पर्यावरणाचे निमित्त पुढे करून या झाडांच्या तोडीकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे दरवर्षी अनेक झाडे किंवा झाडाच्या फांद्या रस्त्यावर पडण्याचा प्रकार सर्रास पहावयास मिळतो.
खानापूर परिसरात खानापूर जांबोटी महामार्गावरील हनुमान मंदिराजवळ वटपौर्णिमेदिवशी वडाची भलीमोठी फांदी रस्त्यावर पडल्याने काही काळ रस्त्यावरील वाहतूक बंद झाली होती. तर त्याच आठवड्यात खानापूर-बेळगाव रस्त्यावरील हलकर्णीजवळ रस्त्यावर फांदी पडून तेथील वाहतुकीत व्यत्यय निर्माण झाला होता. तर मंगळवारी हेब्बाळजवळील रस्त्यावर झाड पडल्याने वाहतुकीला अडचण निर्माण झाली नसली तरी रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांत मात्र भीती निर्माण झाली आहे.