वार्ताहर /दाभाळ
जांभळीमळ – निरंकाल येथे मुख्य रस्त्यावर झाड कोसळल्याने फोंडा-दाभाळ मार्गावरील वाहतूक साधारण दीड तास खोळंबून राहिली. सोमवारी सकाळी 7 वा. सुमारास ही घटना घडली. झाड कोसळतेवेळी सुदैवाने रस्त्यावर एकही वाहन नव्हते, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
दाभाळ निरंकालमार्गे फोंडय़ाकडे जाणारा हा मुख्य रस्ता असल्याने या मार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. झाड रस्त्याच्या मधोमध पडल्याने दोन्ही बाजुने ये जा करणारी वाहने अडकून पडली. सकाळी शाळेला जाणारे विद्यार्थी, कामगार तसेच अन्य प्रवाशांची त्यामुळे गैरसोय झाली. फोंडा अग्नीशामक दलाच्या पथकाने घटनास्थळी येऊन झाड बाजूला हटविल्यानंतर साधारण 8.30 वा. रस्ता वाहतुकीसाठी मोकळा झाला. दरम्यान या मार्गावर अशी बरीच जुनी झाडे कोसळण्याच्या स्थितीत असून त्यांचे सर्वेक्षण करुन ती कापून टाकण्याची मागणी स्थानिक पंचसदस्य मधू खांडेपारकर यांनी केली आहे.









