नंगिवली चौक परिसर, पोवार गल्लीतील नागरिकांची स्थिती : पाच पावलावर पाण्याचा खजिना, 15 लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी असूनही पाण्यासाठी वणवण
कोल्हापूर/विनोद सावंत
‘पाण्याचा खजिन उशाला आणि कोरड घशाला’ अशी स्थिती मंगळवार पेठेतील नंगिवली चौक परिसर तसेच पोवार गल्लीतील नागरिकांवर आली आहे. तीन-चार महिन्यांपासून येथे पाण्याचा बट्ट्याबोळ उडाला आहे. परिसरातील महिलांनी दोन दिवसांपूर्वी पाण्याचा खजिना येथील पाणीपुरवठ कार्यालयावर घागर मोर्चा काढूनही काही फरक पडलेला नाही.
नंगिवली चौक येथे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने 15 लाख लिटर क्षमतेची टाकी उभारली आहे. तसेच 1877 मध्ये उभारलेला ऐतिहासिक पाण्याचा खजिनाही येथे आहे. 143 वर्षानंतर आजही तो सुस्थितीमध्ये असून कार्यरत आहे. पूर्वी कळंबा तलाव येथून सायफन पद्धतीने पाणी आणून परिसरात पाणीपुरवठा केला जात होता. आता पुईखडी, कळंबा तलाव येथून पाईपलाईनमधून आणलेले पाणी पाण्याच्या खजिना साठवून मंगळवार पेठेसह शिवाजी पेठेतील काही परिसराला पाणीपुरवठा केला जातो.
गेल्या काही दिवसांपासून शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. कधी उपसा केंद्रातील मोटारमध्ये बिघाड तर कधी पाईपलाईनमध्ये गळती यामुळे पाणीपुरवठ्याचा बट्याबोळ उडाला आहे. विशेष म्हणजे पाण्याचा खजिना आणि 15 लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी केवळ पाच पावलावर असूनही नंगिवली चौक परिसर आणि पोवार गल्ली येथे पाण्याची समस्या भ्sाडसावत आहे. येथील नागरिकांनी आंदोलनाचे हत्यार उपसूनही स्थितीत सुधारणा झालेली नाही. नागरीकांनी आता अक्रमक भूमिका घेतली असून तीव्र लढा उभारण्याचा निर्धार केला आहे. पाण्याच्या खजिनासमोरीलच गल्लीतील स्थिती अशी असेल तर शहरात इतर ठिकाणी काय स्थिती असेल, यावरून समोर येते. येथील पाणीपुरवठ्याबाबत प्रशासनाला विचारता त्यांनी उपसा केंद्र येथे नदीची पाणी पातळी कमी असल्याचे कारण पुढे केले आहे.
ढिसाळ नियोजन, माजी नगरसेवकांचा हस्तक्षेप
शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होण्यास पाणीपुरवठा विभागाचे ढिसाळ नियोजन कारणीभूत आहे. माजी नगरसेवकांचाही हस्तक्षेप कळीचा मुद्दा आहे. आपल्या प्रभागात पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी ते पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांवर दबाव टाकतात. त्यामुळे दुसऱ्या प्रभागात पाण्याची समस्या होते. काही नगरसेवकांनी व्हॉल्व्ह सोडण्यासाठीची हत्यारेच लोखंडी (पाना) आपल्या घरी ठेवली आहेत.
पूर्वी पूर्ण क्षमतेने पाणी मिळत होते. तीन महिन्यांपासून पाण्याची समस्या सुरू झाली आहे. दोन दिवसांपूर्वी पाण्याच्या खजिना येथील कार्यालयात मोर्चा काढूनही स्थितीत सुधारणा झालेली नाही. पाण्याची समस्या तत्काळ मार्गी लावावी अन्यथा पाण्याचा खजिना पाणीपुरवठा कार्यालयावर हल्लाबोल करावा लागेल.
अनिल शेवाळे, नागरिक, नंगिवली चौक परिसर
अगोदर पहाटे 5 ते सकाळी आठ असे तीन तास प्रेशरने पाणी येत होते. दुसऱ्या मजल्यावर मोटारशिवाय पाणी जात होते. गेल्या काही दिवसांपासून अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. आता एक तासही येत नाही. पाण्याचा खजिना जवळ असताना ही स्थिती होणे खेदजनक आहे.
अनंत पाटील, नागरीक, पोवार गल्ली, पाण्याचा खजिना परिसर
जागा असेल तर घ्यावा
कात्यायनी डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पाण्याचा प्रवाहाचा उपयोग करून कळंबा येथे 1873 मध्ये तळे बांधले. या पाण्याला बांध घालण्यात आला. नैसर्गिक उताराच्या आधार दगडी दगडी पाटातून पाणी नंगिवली दर्गापर्यंत आणले. तत्कालीन मेजर वॉल्टर ड्यूकर यांनी ही योजना केली. त्यांनी 2 लाख 94 हजार 500 गॅलन पाणी साठा करणारी टाकी नंगिवली दर्गाजवळ 1877 मध्ये उभारली त्यास पाण्याचा खजिन असे म्हटले जाते. पुण्याचे बाबुराव केशव ठाकुर यांनी शहरातील पाण्याची समस्या ओळख्tन 3 लाख रूपये खर्चुन ही टाकी उभारली होती. तसा उल्लेख पाण्याच्या खजिनावरील शिलालेखावरही आहे. विशेष म्हणजे शहरातील उंच व सखल भागाचा विचार करून विजेच्या पंपाचा वापर न करता नैसर्गिक उताराने शहरात पाणीपुरवठा होईल, अशी ही टाकी बांधली अहे.









