वार्ताहर /हलगा
हलगा शिवारात पिंजराने भरलेल्या ट्रक्टरला सर्व्हिस वायरचा स्पर्श झाल्यामुळे ट्रक्टरमधील गवताला आग लागल्याची घटना रविवार दि. 26 रोजी घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रक्टर ट्रॉलीमधील गवत पूर्णपणे जळले आहे. यामुळे शेतकऱयाचे मोठे नुकसान झाले आहे. बस्तवाड शेतवडीतील वाळलेले गवत शिनोळी खुर्द येथील कृष्णा खांडेकर हे शेतकरी घेऊन जात होते. दुपारी चारच्या सुमारास हलगा गावाजवळ सदर ट्रॉलीतील गवत सर्वीस वायरला लागल्याने या ट्रॉलीतील गवताला आग लागली. आगीने रुद्रावतार धारण केल्यामुळे परिसरातील शेतकरी जमा झाले व यातील इंजिनला बाहेर काढले गेले. तात्काळ शेतकऱयांनी ट्रक्टरो इंजिन बाहेर काढल्यामुळे कोणताही जीवितहानी झाली नाही. परंतू कृष्णा खांडेकर याला इंजिन काढतेवेळी आगीमुळे थोडी दुखापत झाली आहे. आगीत ट्रॉलीतील संपूर्ण गावत व ट्रॉली, ट्रॉलीची चाके जळलेली आहेत. यामुळे खांडेकर (शिनोळी खुर्द ता. चंदगड) यांचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. ग्रा. पं. अध्यक्ष सदानंद बिळगोजी यांनी अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिल्यामुळे लागलीच अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले व ही आग विझविण्यात आली. यावेळी हलगा येथील शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.









