जगात काही स्थाने अशी आहेत, जी पूर्वी गजबजलेली होती, असे सांगितले जात आहे. मात्र, काळाच्या ओघात अशा काही घटना या शहरांमध्ये घडल्या, की ती ओस पडली. या शहरांमध्ये आज केवळ मोजकेच लोक राहतात. त्यांना शहर सोडवत नाही, म्हणून ते तिथेच राहणे पसंत करतात. ब्रिटनमध्ये असे एक शहर आहे. आज तिथे केवळ अवघ्या चार लोकांचेच वास्तव्य आहे.
हे शहर ब्रिटनचे चेर्नोबिल म्हणून ओळखले जाते. काही दशकांपूर्वी ते ब्रिटनमधील महत्वाचे व्यापार आणि उद्योग केंद्र होते. तेथे वीजनिर्मिती करण्यासाठी अणुकेंद्र स्थापन करण्यात आले. त्यानंतर येथील वातावरणच बदलले. या अणुउत्सर्जनामुळे बहुतेक लोकांना शहर सोडावे लागले. ब्रिटनच्या प्रशासनानेही त्यांना तेथून हटण्याची सूचना केली. त्यामुळे बहुतेकांनी शहराबाहेर, अणुकेंद्रापासून दूरच्या आणि सुरक्षित अंतरावर घरे बांधली आणि तेथे राहण्यास प्रारंभ केला. असे होता होता या शहरात आता अवघी चार माणसे उरली आहेत. या शहरात इतर सर्व सुविधा आहेत. मोठे मॉल्स, मार्ग, पदपथ, उद्याने, शाळा, इतर आस्थापने, पाण्याची व्यवस्था, स्वच्छता यंत्रणा आदी सर्व काही येथे आहे. तथापि, ते बंद अवस्थेत आहे. केवळ चार लोकांची वस्ती असल्याने त्यांच्यापुरत्याच सोयी आता उरल्या आहेत. या चार जणांचा या शहरावर इतका जीव आहे, की, त्यांना तेथून दुसरीकडे जावे असे वाटत नाही. त्यामुळे ते तिथेच राहतात.









