प्रतापगड :
महाबळेश्वर-पोलादपूर रस्त्यावर असलेल्या आंबेनळी घाटात शनिवारी सकाळी एक भीषण अपघात घडला. दाट धुकं आणि निसरड्या रस्त्यांमुळे पर्यटकांची एक मोटार उलटली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र वाहनातील पर्यटक किरकोळ जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य करत जखमींना रुग्णालयात दाखल केले.
पोलादपूरहून महाबळेश्वरकडे जाणारे हे पर्यटकांचे वाहन अंबेनळी घाटातून जात असताना अचानक पावसाने आणि धुक्याने रस्ता वेढला. या दाट धुक्यामुळे वाहनचालकाला पुढील रस्ता स्पष्ट दिसेनासा झाला. त्यातच, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घाटातील रस्त्याच्या कडेचे भाग (साईड पट्टी) अत्यंत निसरडे आणि शेवाळलेले झाले होते. यामुळे चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने वाहन थेट खाली उतरले आणि उलटले. अपघात घडताच स्थानिक नागरिक तत्परतेने घटनास्थळी धावले आणि त्यांनी मदतकार्य सुरू केले. त्यांनी तातडीने पर्यटकांना वाहनातून बाहेर काढले आणि उपचारासाठी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवले. वाहनाचे मोठे नुकसान झाले असले तरी जीवितहानी टळल्याने नातेवाईकांनी आणि स्थानिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. महाडनाका ते पोलादपूर या संपूर्ण घाट रस्त्यावर अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर नाहीत. धुक्यात किंवा रात्रीच्या वेळी प्रवास करताना रस्ता आणि दरी यातील फरक ओळखणे अत्यंत कठीण होते. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत आहेत, असे स्थानिकांनी म्हटले आहे. घाटात रस्त्याच्या कडेला तातडीने रिफ्लेक्टर, मार्गदर्शक फलक आणि साईड पट्टीची दुरुस्ती करण्यात यावी.








