दापोली :
तालुक्यातील आंजर्ले समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या पर्यटकाला वाचवण्यात येथील तरुणांना यश आले आहे. ही घटना रविवारी सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान घडली.
परीक्षा कालावधीमुळे सध्या पर्यटक कमी प्रमाणात असले तरी शनिवार, रविवार पर्यटक दापोलीतील किनाऱ्यावर हमखास येताना दिसत आहेत. रविवारी सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान आंजर्ले समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणांपैकी एक तरुण प्रवाहाबरोबर वाहत गेला. पर्यटक समुद्रात वाहून जात असल्याची माहिती मकरंद म्हादलेकर यानी आंजर्ले तंटामुक्ती अध्यक्ष संदेश देवकर यांना कळवताच त्यांनी त्वरित किनाऱ्यावर बोटिंग सेवा देणारे अजिंक्य ऊर्फ बाळा केळसकर यांना मोबाईलवरून घटना कळविली. त्यानंतर अजिंक्य केळसकर, अथर्व सरनोबत, प्रितेश उर्फ बाब्या मयेकर आणि सहकाऱ्यांनी तातडीने समुद्रावर धाव घेत आपली बोट समुद्रात लोटून या बुडणाऱ्या पर्यटकाला तत्परतेने किनाऱ्यावर सुरक्षित आणले. यावेळी पर्यटकाच्या तोंडात खूप पाणी गेल्याचे लक्षात आल्यावर त्याच्यावर ताबडतोब उपचार करण्यात आले.
यावेळी अंजिक्य केळसकर आणि टीमच्या मदतीला सुरज रहाटवळ, शुभम आरेकर, प्रथमेश तोडणकर, सिद्धेश देवकर आणि सहकाऱ्यांनी विशेष सहकार्य केले. त्यानंतर खबरदारी म्हणून वैद्यकीय तपासणीसाठी पर्यटकाला नेण्यात आले. दरम्यान वेळेत मदत मिळाल्यामुळे या पर्यटकाचे प्राण वाचले असून त्याच्या जीविताला कोणताही धोका नसल्याचे सांगण्यात आले. आंजर्लेतील तरुणांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच पर्यटकांनी समुद्रात स्नानासाठी जाताना काळजी घेण्याचे आवाहनही गावातर्फे करण्यात आले आहे.








