वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रविवारी येथे झालेल्या नवी दिल्ली मॅरेथॉनमध्ये पुरुष विभागात मानसिंगने तर महिलांच्या विभागात ज्योती गवातेने विजेतेपद पटकाविले. ज्योती गवातेने यापूर्वी झालेल्या नवी दिल्ली मॅरेथॉनमध्ये महिलांच्या विभागात जेतेपदासह मिळविलेले सुवर्णपदक पुन्हा यावेळी स्वतःकडे राखले.
पुरुषांच्या विभागात 33 वर्षीय मानसिंगने 2 तास 14 मिनिटे आणि 13 सेकंदाचा अवधी घेत प्रथम स्थानासह सुवर्णपदक मिळविले. गेल्या महिन्यात झालेल्या मुंबई मॅरेथॉनमध्ये मानसिंगने 2 तास 16 मिनिटे आणि 58 सेकंदाचा अवधी नोंदवित दुसरे स्थान मिळविले होते. मानसिंगची नवी दिल्ली मॅरेथॉनमधील ही सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे. मानसिंगला या जेतेपदाबरोबरच सुवर्णपदक आणि दीड लाख रुपयांचे बक्षीस मिळाले. पुरुषांच्या विभागात एबी बेलिआप्पाने 2 तास 14 मिनिटे आणि 15 सेकंदाचा अवधी घेत रौप्यपदकासह दुसरे स्थान तर कार्तिक कुमारने 2 तास 14 मिनिटे 19 सेकंदाचा अवधी घेत कांस्यपदकासह तिसरे स्थान मिळविले. पुरुषांसाठी सदर स्पर्धा 42.195 किमी पल्ल्याची आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये पुरुष विभागातील पहिल्या तीन क्रमांकावरील धावपटूंनी हेंग झोयु आशियाई क्रीडा स्पर्धेच्या प्रवेशासाठीची पात्रता मर्यादा पार केली आहे. आशियाई स्पर्धेसाठी अखिल भारतीय ऍथलेटिक्स फेडरेशनने 2 तास 15 मिनिटे ही मर्यादा ठेवली होती.
महिलांच्या विभागात ज्योती गवातेने 2 तास 53 मिनिटे 04 सेकंदाचा अवधी घेत सुवर्णपदकासह विजेतेपद मिळविले. मात्र तिला. आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीची पात्रता मर्यादा पार करता आली नाही. आशियाई स्पर्धेसाठी पात्रतेची मर्यादा 2 तास 37 मिनिटे ठेवण्यात आली होती. गेल्या वर्षी ज्योतीने या स्पर्धेचे जेतेपद मिळविताना 3 तास 01 मिनिट 20 सेकंदाचा अवधी घेतला होता. नवी दिल्ली मॅरेथॉन स्पर्धा चार विविध गटात घेण्यात आली. हाफ मॅरेथॉन, 10 किमी, 5 किमी अशा विविध गटात सुमारे 16 हजार धावपटूंनी सहभाग दर्शविला होता. महिलांच्या विभागात अश्विनी जाधवने 2 तास 53 मिनिटे 06 सेकंदाचा अवधी घेत रौप्यपदक तर जिगमेट डोल्माने 2 तास 56 मिनिटे आणि 41 सेकंदाचा अवधी घेत कांस्यपदक मिळविले.









