वृत्तसंस्था/ वेलिंग्टन
दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील येथे सुरु असलेल्या दुसऱया आणि शेवटच्या सामन्यात इंग्लंडकडून यजमान न्यूझीलंडला रविवारी खेळाच्या तिसऱया दिवशी फॉलोऑन स्वीकारावा लागला. पण न्यूझीलंड दुसऱया डावात चिवट फलंदाजी करत आपला संभाव्य पराभव लांबविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. न्यूझीलंडने दुसऱया डावात 3 बाद 202 धावा जमविल्या आहेत. लॅथम आणि कॉन्वे यांनी सलामीच्या गडय़ासाठी शतकी भागीदारी केली. न्यूझीलंडचा संघ अद्याप 24 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे 7 गडी खेळावयाचे आहेत.

या मालिकेत इंग्लंडने पहिली कसोटी जिंकून न्यूझीलंडवर आघाडी मिळविली आहे. या दुसऱया कसोटीत इंग्लंडने पहिल्या डावात 435 धावांचा डोंगर उभा केल्यानंतर अँडरसन, ब्रॉड आणि लीच यांच्या भेदक माऱयासमोर न्यूझीलंडचा पहिला डाव 53.2 षटकात 209 धावात आटोपला. इंग्लंडने पहिल्या डावात न्यूझीलंडवर 226 धावांची आघाडी मिळविल्याने त्यांनी न्यूझीलंडला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने 7 बाद 138 या धावसंख्येवरुन तिसऱया दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांच्या शेवटच्या तीन फलंदाजांनी 71 धावांची भर घातली. कर्णधार टीम साऊदीने एकाकी लढत देत 49 चेंडूत 6 षटकार आणि 5 चौकारांसह 73 धावा झळकाविल्या पण साऊदीचे हे प्रयत्न न्यूझीलंडला पराभवापासून वाचवू शकले नाहीत. न्यूझीलंडचा पहिला डाव 53.2 षटकात 209 धावात आटोपला. इंग्लंडतर्फे ब्रॉडने 61 धावात 4, अँडरसनने 37 धावात 3, लीचने 80 धावात 3 गडी बाद केले.
फॉलोऑन स्वीकारल्यानंतर टॉम लेथम आणि कॉन्वे या सलामीच्या जोडीने न्यूझीलंडच्या दुसऱया डावाला दमदार सुरुवात करुन देताना 52.5 षटकात 149 धावांची शतकी भागीदारी केली. इंग्लंडच्या लीचने कॉन्वेला झेलबाद केले. त्याने 155 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 61 धावा जमविल्या. त्यानंतर लॅथम रुटच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्याने 172 चेंडूत 11 चौकारांसह 83 धावा झळकाविल्या. लीचने यानंतर यंगचा त्रिफळा उडविला. त्याने 8 धावा जमविल्या. विल्यमसन 2 चौकारांसह 25, तर निकोल्स 1 चौकारासह 18 धावावर खेळत आहेत. इंग्लंडतर्फे लीचने 59 धावात 2 तर रुटने 18 धावात 1 गडी बाद केला. रविवारी खेळाच्या शेवटच्या सत्रात न्यूझीलंडने आपले 3 फलंदाज केवळ 18 धावात गमविले. सोमवारी खेळाच्या चौथ्या दिवशी न्यूझीलंडचे फलंदाज चिवट फलंदाजी करुन पराभव लांबविण्याचा प्रयत्न करतील.
संक्षिप्त धावफलक ः इंग्लंड प. डाव – 87.1 षटकात 8 बाद 435 डाव घोषित, न्यूझीलंड प. डाव – 53.2 षटकात सर्व बाद 209 (साऊदी 73, ब्लंडेल 38, निकोल्स 30, मिचेल 13, लॅथम 35, ब्रॉड 4-61, अँडरसन 3-37, लीच 3-80), न्यूझीलंड दु. डाव – 83 षटकात 3 बाद 202 (लॅथम 83, कॉन्वे 61, यंग 8, विल्यमसन खेळत आहे 25, निकोल्स खेळत आहे 18, लीच 2-59, रुट 1-18).









