हत्तीच्या सुळ्यांपासून अनेक सुबक आणि कलाकुसर असलेल्या वस्तू निर्माण केल्या जातात, हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे हत्तीचे सुळे आणि दात प्रचंड महाग असतात. हत्तीच्या दाताइतका महाग दात जगामध्ये कोणत्याही प्राण्याचा असू शकणार नाही, असे आपल्याला वाटत असते. पण हत्तीच्या दातापेक्षाही महाग दात एका प्राण्याचा आहे. त्याचे नाव आपल्या अत्यंत परिचयाचेच आहे. ते म्हणजे, रानडुक्कर. रानडुकरांची शिकार अतीप्रमाणात झाल्याने काही स्थानी त्यांची प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे त्यांच्या शिकारीवर बंदीही घालण्यात आली आहे. तरीही चोरुन त्यांची शिकार होतच असते.
रानडुकराची शिकार त्याच्या चविष्ट मांसासाठी करतात, अशी आपली समजूत असते. ती खरीही आहे. पण, मांसापेक्षा त्याच्या दातासाठी शिकार केली जाते. रानडुकराला दोन सुळे असून ते त्याच्या तोंडाबाहेर आलेले असतात. ते फारसे मोठेही नसतात. पण अशा एक सुळ्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 20 ते 25 लाख रुपये असल्याचे बोलले जाते. तो इतका महाग का असतो ? त्याच्यापासून कोणत्या मौल्यवान वस्तू बनविल्या जातात ? असे प्रश्न आपल्याला पडतात. त्यांचे उत्तरही त्यांच्या किमतीइतकेच आश्चर्यकारक आहे. रानडुकराच्या सुळ्याचा उपयोग मंत्रतंत्र आणि जारणमारण करण्याची प्रथा काही देशांमध्ये आहे. म्हणून त्याची किंमत इतकी असते, असे कारण सांगितले जाते.









