केजरीवाल सरकारकडून अर्थसंकल्प सादर : रामराज्यासाठी 9 वर्षे दिवसरात्र केली मेहनत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीच्या अर्थमंत्री आतिशी मार्लेना यांनी सोमवारी 2024-25 साठी 76 हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे. आतिशी यांनी अर्थसंकल्पात 18 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या महिलांना दर महिन्याला एक हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. याकरता अरविंद केजरीवाल सरकार महिला सन्मान योजना सुरू करणार आहे.
आतापर्यंत श्रीमंतांचा मुलगा श्रीमंत व्हायचा, गरीबाचा मुलगा गरीबच राहत होता. हा प्रकार रामराज्याच्या कल्पनेच्या उलट होता. केजरीवाल सरकारने ही स्थिती बदलली आहे. आता मजुरांची मुले देखील व्यवस्थापकीय संचालक होत असल्याचा दावा आतिशी यांनी विधानसभेत अर्थसंकल्प मांडताना केला आहे.
दिल्लीत रामराज्य
विधानसभेत उपस्थित सर्व लोक भगवान रामाने प्रेरित आहेत. आम्ही मागील 9 वर्षांपासून रामराज्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करत आहोत. आम्ही दिल्लीवासीयांना समृद्धी मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. अद्याप बरेच काही करायचे आहे, परंतु आम्ही मागील 9 वर्षांमध्ये खूप काही केले असल्याचे आतिशी यांनी म्हटले आहे.
शालेय शिक्षणावर लक्ष
केजरीवाल सरकारने जुन्या गोष्टी बदलल्या आहेत. केजरीवाल सरकारच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या 2121 विद्यार्थ्यांनी जेईई आणि नीटमध्ये यश मिळविले आहे. शिक्षणक्षेत्राला आमच्या सरकारची प्राथमिकता आहे. 2015 मध्ये आम्ही शिक्षणासाठीची तरतूद दुप्पट केली होती. आम्ही आमच्या अर्थसंकल्पाचा एक चतुर्थांश हिस्सा केवळ शिक्षणावर खर्च करत आहोत असे आतिशी यांनी नमूद पेले आहे.









