नगरसेवक बाळकृष्ण होडारकर यांची मागणी : कोणताच राजकीय हस्तक्षेप होणार नाही याची काळजी घ्यावी
प्रतिनिधी /कुडचडे
बाणसाय, कुडचडे येथे रेती व्यवसायात असलेल्या कामगाराचा अज्ञात व्यक्तीकडून झालेल्या खुनाच्या मुद्यावर कुडचडे-काकोडा नगरसेवक बाळकृष्ण होडरकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणी कसून चौकशी व्हावी तसेच सदर चौकशीत कोणताच राजकीय हस्तक्षेप होता कामा नये याची काळजी वरिष्ठ अधिकाऱयांनी घ्यावी, अशी मागणी केली आहे .
हे प्रकरण घडल्याबद्दल रेतीचा व्यवसाय करत असलेल्यांवर आरोप आपण करणार नाही. कारण आज गोव्याचा मुख्य खाण व्यवसाय बंद करण्यात आला आहे तसेच कोविड महामारीने लोकांची आर्थिक स्थिती अत्यंत खालच्या पातळीवर पोहोचविलेली आहे. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हावा म्हणून या व्यवसायात काही लोक घुसले आहेत. जर व्यवसाय चुकीच्या पद्धतीने चालत आहे, तर त्यात सहभागी असलेल्यांना चांगल्या प्रकारे व्यवसाय करण्याबद्दल मार्गदर्शन करण्याचे काम निवडून आणलेल्या लोकप्रतिनिधींचे आहे, असे होडारकर यावेळी म्हणाले.
पण कुडचडेत सर्व काही उलटे झालेले आहे. लोकांना चुकीच्या मार्गावर चालण्यास सांगणे, ते त्रासात पडल्यावर स्वतःच त्यांना हात देणे व आपण सावरल्याचे खोटे नाटक करून दाखविणे आणि या गोष्टीची आठवण करून देऊन निवडणुकीत त्यांचा फायदा करून घेणे असे प्रकार चालत आहेत, असा दावा होडारकर यांनी केला. निवडणुकीसाठी वापर करून घेण्यात काही हरकत नाही. पण लोकांना चांगल्या मार्गावर पोहोचवून त्यांचा वापर करा, त्यांना अडचणीत टाकून करू नका. कारण यामुळे नवीन पिढी पूर्णपणे गैरमार्गांच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले.
रेती व्यवसाय कायदेशीर करा
कुडचडे मतदारसंघात इतके मोठे प्रकरण घडले आहे. पण यावर आजपर्यंत कायदामंत्री असून सुद्धा स्थानिक आमदार जनतेसमोर आलेले नाहीत. त्यांना जर हे खाते पेलत नसेल, तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना दुसरे खाते द्यावे, अशी मागणी होडारकर यांनी केली. कुडचडेत घडलेली घटना ही सामान्य नसून या प्रकरणाचा सोक्षमोक्ष न लागल्यास पुढे त्याचे तीव्र परिणाम होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे रेती व्यवसायावर कित्येक कुटुंबे अवलंबून असल्याने तो कायदेशीररीत्या चालण्याच्या दृष्टीने सरकारने लवकरात लवकर लक्ष घालावे. त्यामुळे सरकारच्या तिजोरीतील महसूल वाढेल व अशा घटनांना पूर्णविराम लागेल, असे ते म्हणाले.
राजकीय हस्तक्षेप होता कामा नये
नुकताच मुख्यमंत्र्यांनी अमली पदार्थांचा बिमोड करण्याच्या दृष्टीने जो आदेश दिलेला आहे तो कौतुकास्पद असून यासंदर्भात कारवाई करताना राजकीय हस्तक्षेप होणार नाही व आरोपींना कडक शिक्षा होईल यावर भर द्यायला हवा. आज कुडचडे परिसरातही ज्या प्रकारे युवा पिढी अमली पदार्थांना बळी पडत आहे ते चिंताजनक असून यावर स्थानिक आमदार एक वाक्य सुद्धा बोललेले नाहीत. उलट याअगोदर राज्याच्या तिजोरीत पैसा यावा म्हणून गांजा शेतीसाठी अनुकूल मत कुणी व्यक्त केले होते त्याची सर्वांना आठवण आहे, असे होडारकर म्हणाले. लोकप्रतिनिधी कुठे चुकत असेल, तर मतदारांनी त्यांना त्यांची चूक दाखवून द्यायला हवी. एक स्थानिक या नात्याने मी आवाहन करतो की, आम्हा सर्वांनी एकत्र येऊन या अमली पदार्थविरोधी मोहिमेला हातभार लावायला हवा व नवीन पिढीला चांगल्या मार्गावर ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा, असे ते म्हणाले.
…तर न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरणार
याअगोदर कुडचडेत अशाच प्रकारे काही खून प्रकरणे घडलेली आहेत ज्यांचा आजपर्यंत छडा लागलेला नाही. त्यात कोण गुंतले होते ते उघड झालेले नाही. हल्लीच रेती व्यवसायाच्या बाबतीत अशीच एक घटना घडली होती. पण ती घटना बॅटरी फुटल्याचा मुद्दा पुढे करून मागे टाकण्यात आली अशी माहिती मिळाली आहे. त्याचवेळी कडक कारवाई झाली असती, तर आज एका व्यक्तीचा जीव गेला नसता. याची जाणीव स्थानिक लोकांना व्हायला हवी. त्यामुळे सदर कामगाराच्या खून प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या तावडीत सपडणे आवश्यक आहे. अन्यथा पुढे अशी प्रकरणे सर्रास घडू शकतात, याकडे होडारकर यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना लक्ष वेधले. सध्या या घटनेचा जे अधिकारी तपास करत आहेत ते वरिष्ठ आणि कडक असल्याची माहिती मिळाली आहे. तरीही राजकीय दबावाखाली हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून आल्यास आपण योग्य वेळी मयत कामगाराला न्याय मिळण्यासाठी रस्त्यावर उतरणार, असा इशारा त्यांनी दिला आहे.









