बुलकतर्फे ‘शब्दलाटा’ कार्यक्रमातून ओगलेंच्या आठवणींना उजाळा
प्रतिनिधी/ बेळगाव
अर्थपूर्ण, वास्तववादी साहित्य हे कालातीत असते. कवी किंवा लेखकांनी जरी जगाचा निरोप घेतला तरी त्यांचे साहित्य चिरंतन राहते, फक्त ते साहित्य दर्जेदार मात्र हवे. बेळगावचे दिवंगत कवी अविनाश ओगले यांच्या साहित्यावर बुलकतर्फे झालेल्या ‘शब्दलाटा’ या कार्यक्रमाने याचे प्रत्यंतर दिले. सादरकर्ते माधव कुंटे यांनी ओगले यांच्या साहित्याचा नेमका आढावा घेतला.
बुलकने महिन्यातून एकदा कवीची ओळख करून देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. शुक्रवारी माधव कुंटे यांनी ओगले यांच्याशी झालेल्या मैत्रीच्या आठवणींना उजाळा दिला. हा कवी बँकेच्या कामामुळे कवितेपासून काही काळ दूर केला. परंतु पुन्हा त्याने कवितेला जवळ केले, असे सांगून ‘जगण्याचे जर भान पाहिजे’ ही कविता सादर केली. युगपुरुष लोकमान्य या चित्रपटामध्ये अविनाश यांची कविता नाना पाटेकर यांनी म्हटली आहे, याचा उल्लेखही त्यांनी केला. बेळगावमधील कवी संमेलने, लोकमान्य ग्रंथालयाची उभारणी, जी. ए. दालनाची रुपरेषा ठरविण्यामध्ये त्यांचे योगदान यांचा त्यांनी उल्लेख केला.
याशिवाय विडंबन, गझल, हजल, चारोळ्या असे सर्व प्रकार त्यांनी सहजी हाताळले असे सांगून कॉम्प्युटर, आई, सये तुझे डोळे, परिवर्तन, पुतळे मोर्चा काढतात, त्यांच्या कवितेतील पाऊस, अशा अनेक कविता, शिवाय ज्ञानोबांनाच प्रश्न करणारी त्यांची कविता कुंटे यांनी सादर केली. ओगले यांच्या पत्नी अश्विनी यांनी विनोद गायकवाड व चंद्रकांत पोतदार यांच्या सहकार्याने अविनाश यांच्या मृत्यूनंतर त्यांचे कविता संग्रह व लेख प्रकाशित केले. त्यातील काही उतारेसुद्धा कुंटे यांनी वाचून दाखविले. प्रारंभी किशोर काकडे यांनी स्वागत केले.









