वृत्तसंस्था/ मोहाली
2023 च्या टाटा आयपीएल चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत बुधवारी येथे यजमान पंजाब किंग्ज आणि आतापर्यंत पाचवेळा आयपीएल चषक पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्स संघातील सामन्याला सायंकाळी 7.30 वाजता प्रारंभ होणार आहे. या सामन्यात पंजाब किंग्जकडून मुंबई इंडियन्स संघाच्या दर्जाची चाचणी घेतली जाईल तर मुंबई इंडियन्सच्या दृष्टीने स्पर्धेच्या गुणतक्त्यात मुसंडी मारण्यासाठी हा सामना महत्त्वाचा राहिल.
गुणतक्त्यात मुसंडी मारण्याकरिता मुंबईला बुधवारच्या सामन्यात कोणत्याही परिस्थितीत विजयाची आवश्यकता आहे. दरम्यान हा सामना गमवला तर गेल्या वर्षीच्या आयपीएल प्रमाणेच मुंबई इंडियन्स संघाची स्थिती होऊ शकेल. गेल्या आयपीएल स्पर्धेत मुंबई संघ दहाव्या आणि शेवटच्या स्थानावर राहिला होता. 2023 च्या आयपीएल स्पर्धेत गुणतक्त्यात मुंबई संघाने सध्या 8 सामन्यातून आठ गुणासह सातवे स्थान मिळवले आहे. 30 एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सला पराभवाचा धक्का दिला होता. 212 धावांचा पाठलाग मुंबई इंडियन्सने यशस्वीपणे करत हा सामना तीन चेंडू बाकी ठेवून जिंकत दोन महत्त्वाचे गुण मिळवले होते. या सामन्यात ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू टीम डेव्हिडने शेवटच्या षटकातील पहिल्या तीन चेंडूवर सलग तीन षटकार ठोकून आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. राजस्थान रॉयल्सच्या तोंडातील विजयाचा घास मुंबईने हिसकावून घेतला होता. या सामन्यात सूर्यकुमार यादव, अष्टपैलू ग्रीन आणि इशान किसन व तिलक वर्मा यांची फलंदाजीतील कामगिरी समाधानकारक झाली होती. टीम डेव्हिडने या सामन्यात 2 चौकार आणि 5 चौकार खेचत आपल्या संघाला घरच्या मेदानावर प्रेक्षणीय विजय मिळवून दिला होता.

अशाच प्रकारचा विजय पंजाब किंग्ज संघाने 30 एप्रिल रोजी चेपॉकच्या मैदानावर चेन्नई संघाविरुद्ध मिळवला होता. शिखर धवन आणि प्रभसिमरन सिंग या सलामीच्या जोडीने संघाच्या डावाला चांगली सुरुवात करून दिली होती. धोनीच्या चेन्नई संघाने पंजाब किंग्ज संघाला विजयासाठी 201 धावांचे आव्हान दिले होते पण पॉवर प्ले दरम्यान धवन आणि प्रभसिमरन सिंग यांनी महत्त्वाची भागीदारी करत विजयाचा पाया रोवला होता. त्यानंतर इंग्लंडचा अष्टपैलू लिव्हिंगस्टोन, सॅम करन आणि यष्टीरक्षक व फलंदाज जितेश शर्मा हे लवकर बाद झाले होते. मुंबईविरुद्ध बुधवारी होणाऱ्या सामन्यात लिव्हिंगस्टोन, करण आणि शर्मा यांची फलंदाजी चांगली होणे गरजेचे आहे. मुंबई संघात स्थान मिळवलेल्या इंग्लंडच्या आर्चरने राजस्थान विरुद्धच्या सामन्यात एक बळी मिळवला होता. कर्णधार रोहित शर्मा मोठी धावसंख्या रचण्यासाठी झगडत आहे. राजस्थान विरुद्धच्या सामन्यात तो केवळ 3 धावावर बाद झाला होता.
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, ब्रेव्हिस, तिलक वर्मा, इशान किसन, स्टब्ज, विष्णू विनोद, कॅमेरुन ग्रीन, रमणदीप सिंग, शाम्स मुलानी, मेर्डीथ, वधेरा, शोकीन, अर्षद खान, जेनसेन, पीयुष चावला, कार्तिकेय, संदीप वॉरियर, आर. गोयल, जॉर्डन, आर्चर, बेहरेनडॉर्फ, आकाश मधवाल आणि अर्जुन तेंडुलकर.
किंग्ज इलेव्हन पंजाब : शिखर धवन (कर्णधार), अर्शदीप सिंग, बालतेज सिंग, राहुल चहर, सॅम करन, ऋषी धवन, नाथन इलिस, गुरुनूर ब्रार, हरप्रित ब्रार, हरप्रित सिंग, व्ही. कविरप्पा, लिव्हिंगस्टोन, मोहित राठी, प्रभसिमरन सिंग, रबाडा, भानुका राजपक्षे, शाहरुख खान, जितेश शर्मा, शिवम सिंग, मॅथ्यू शॉर्ट, सिकंदर रझा आणि अथर्व तायडे.
सामन्याची वेळ : सायंकाळी 7.30 वाजता









