वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील चसानाजवळ सोमवार, 4 सप्टेंबरला शोध मोहिमेदरम्यान भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. आतापर्यंत एक दहशतवादी मारला गेला आहे. तसेच एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. पोलिसांना सोमवारी गुप्तचर विभागाकडून दोन दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाली होती. त्यानंतर राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेदरम्यान चकमक सुरू झाली. चसाना येथील तुली भागातील गली सोहाबमध्ये सायंकाळी उशिरापर्यंत पोलीस आणि लष्कराकडून कारवाई सुरू होती.
यापूर्वी जुलै महिन्यातही सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. पूंछमधील सिंध्रा भागात पोलिसांसोबत केलेल्या संयुक्त कारवाईत सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांना ठार केले होते. याशिवाय ऑगस्ट महिन्यातही लष्कराने जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिह्यात नियंत्रण रेषेजवळ दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठार करून घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला होता. बालाकोट सेक्टरमधील चकमकीच्या ठिकाणी एक एके-47 रायफल, दोन मॅगझिन, 30 राउंड, दोन हँडग्रेनेड आणि पाकिस्तानी बनावटीची काही औषधे जप्त करण्यात आली होती.