प्रवासी रेल्वेची मालगाडीला धडक : 20 हून अधिक जणांचा मृत्यू, अनेक जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
वृत्तसंस्था/ ढाका
बांगलादेशमध्ये सोमवारी सायंकाळी एक मोठा रेल्वे अपघात झाला. दोन रेल्वेगाड्यांमधील भीषण टक्कर होऊन 20 हून अधिक जणांचा मृत्यू झाला तर शेकडो जखमी झाले. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्मयता पोलिसांनी व्यक्त केली आहे. राजधानी ढाकापासून सुमारे 80 किलोमीटर (50 मैल) अंतरावर असलेल्या किशोरगंजमधील भैरब येथे प्रवासी रेल्वेची मालगाडीला टक्कर झाल्यामुळे रेल्वे अपघात झाल्याची माहिती जारी करण्यात आली आहे.
किशोरगंज येथे झालेल्या रेल्वे दुर्घटनेत 100 हून अधिक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना स्थानिक ऊग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. त्याचबरोबर रेल्वेमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बचाव मोहीम सुऊ करण्यात आली आहे. ढाकाहून जाणारी पॅसेंजर टेन ‘इगारोसिंदूर एक्स्प्रेस’ आणि किशोरगंजकडे जाणारी मालगाडी यांच्यात सोमवारी सायंकाळी 4.15 च्या सुमारास भैरब रेल्वेस्थानकाच्या हद्दीत हा अपघात झाल्याचे भैरब रेल्वे पोलीस स्टेशनचे प्रभारी (ओसी) मोहम्मद अलीम हुसेन शिकदार यांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, किशोरगंजमध्ये प्रवासी रेल्वे आणि मालगाडी यांच्यात भीषण टक्कर झाली. राजधानी ढाकापासून सुमारे 80 किलोमीटर अंतरावर असलेल्या भैरब येथे मालगाडीला पॅसेंजर टेनने धडक दिल्याने हा अपघात झाला. रेल्वेमार्गावर उलटलेल्या डब्यांमध्ये अनेक प्रवासी अडकल्याचा दावा स्थानिक माध्यमांनी केला. दरम्यान, आपत्ती निवारण यंत्रणा आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले. बचावकार्य सुरू असल्याने मृतांची संख्या वाढू शकते, असे स्थानिक पोलीस अधिकारी सिराजुल इस्लाम यांनी सांगितले. अपघातानंतर सुरुवातीच्या तासाभरात बचाव कर्मचारी आणि स्थानिक लोकांनी बचावकार्य सुरू करत तासाभरात 20 जणांचे मृतदेह बाहेर काढले होते.
या भीषण रेल्वे अपघातानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनीही घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. बांगलादेशी टीव्ही चॅनेलनुसार, या रेल्वे अपघातातील मृतांची संख्या 20 पेक्षाही बरीच मोठी असू शकते. अजूनही अनेक लोक अस्ताव्यस्त झालेल्या रेल्वे डब्यांमध्ये अडकले आहेत.









