दैवबलवत्तर म्हणून चालक, प्रवासी बालबाल बचावले : वाहनांचे नुकसान
उचगाव : बेळगाव-वेंगुर्ले मार्गावरील बेळगुंदी फाटा (गणेश दूध संकलन केंद्र) उचगावनजीक रविवारी सकाळी नऊच्या सुमारास बेळगावहून चंदगड भागाकडे जाणाऱ्या दोन कारगाड्यांमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले. दैवबलवत्तर म्हणून किरकोळ दुखापत वगळता वाहनातील चालक, प्रवासी बालबाल बचावले आणि जीवितहानी टळली. तर रहदारी कमी असल्याने इतर वाहनांवरीलही धोका टळला. सदर घटना खराब रस्ता आणि गतिरोधक नसल्याने घडली. या घटनेने या भागातील प्रवासी वर्गातून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या बेदरकार कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. हा रस्त्याचा भाग पूर्णत: खड्ड्यातच हरवल्याने सदर ठिकाण म्हणजे मृत्यूचा सापळाच बनला आहे. मोठमोठे खड्डे आणि त्यात सध्या अधूनमधून पडणाऱ्या पावसाचे साचलेले पाणी, परिणामी दुचाकी वाहने या खड्ड्यात अडकून, पडून अपघाताची मालिकाच या ठिकाणी सुरू झाली आहे. तातडीने सदर खड्डे बुजवावे, अशी मागणी या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांनी केली आहे सदर रस्त्यावरील खड्डे येत्या आठवडाभरात जर बुजवले नाहीतर रास्ता रोको करण्याचा इशारा या भागातील तमाम प्रवासी व नागरिकांनी दिला आहे.
बेळगुंदी फाट्याजवळील खड्डा बनला मृत्यूचा सापळा
बेळगाव-वेंगुर्ला या मार्गावरील बेळगुंदी फाट्यानजीक गणेश दूध संकलन केंद्र जवळील या मुख्य वळणावरतीच जवळपास दहा फूट लांबीचा व तीन ते पाच फूट रुंदीचा आणी जवळपास एक फूट खोलीचे मोठमोठे खड्डे या ठिकाणी पडलेले आहे. अनेक प्रवाशांना या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अनेक लहान मोठी वाहने या खड्ड्यात जात असल्याने अपघात घडत असून अनेकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. प्रवाशांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने पडून दुखापत झाल्याच्या घटना सातत्याने घडल्या आहेत.









