सर्पमित्र राजन निब्रे यांचे प्रसंगावधान
ओटवणे प्रतिनिधी
माजगाव म्हालटकरवाड्यात भरवस्तीत बुधवारी मध्यरात्री दहा फुटी अजगराच्या मुक्त संचारामुळे सर्वांचीच भितीने गाळण उडाली. अखेर याच गावातील सर्पमित्र राजन निब्रे यांना घटनास्थळी पाचारण करून या अजगराला जेरबंद केल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
म्हालटकरवाड्यातील सचिन सावंत बुधवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास लघुशंकेसाठी बाहेर पडले असता त्यांना संतोष शिवराम सावंत यांच्या शेतमांगरात जात असताना हा दहा फुटी अजगर दृष्टीस पडला. त्यांनी याची माहिती संतोष यांच्यासह सतीश सावंत यांना दिल्यानंतर संदेश सावंत, समिक्षा सावंत, सुरज सावंत, सृष्टी सावंत आदी सर्वांचीच भितीने गाळण उडाली. त्यानंतर सर्पमित्र राजन निब्रे यांना बोलावण्यात आले. मध्यरात्र असूनही त्यांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ घटनास्थळी येत मोठ्या शिताफिने या अजगराला जेरबंद केले. या अजगराला सुखरूप रित्या पकडल्यानंतर राजन निब्रे यांनी नैसर्गिक अधिवासात सोडले.









